राजदला राज्यसभेची जागा देण्यास नकार
By Admin | Updated: May 29, 2014 04:13 IST2014-05-29T04:13:46+5:302014-05-29T04:13:46+5:30
लालूप्रसाद यादव यांच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाने घेतला आहे.

राजदला राज्यसभेची जागा देण्यास नकार
हरीश गुप्ता, नवी दिल्ली - लालूप्रसाद यादव यांच्याशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता या पक्षाची राजदसोबत राजकीय आघाडी होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. बिहारमधील राज्यसभेच्या तीन जागांपैकी एक जागा राबडीदेवी यांच्यासाठी सोडण्यासही संयुक्त जनता दलाने स्पष्ट नकार दिला असल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील तुघलक मार्गावर असलेला २५ नंबरचा शासकीय बंगला आपल्याच ताब्यात राहावा, या उद्देशाने राबडीदेवी यांना राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी लालूप्रसाद यादव यांची इच्छा आहे. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरविल्याकारणाने ते सध्या लोकसभा वा राज्यसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची पत्नी राबडीदेवी यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलासोबत आघाडी करण्याची लालूप्रसाद यादव यांची इच्छा आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसल्याकारणाने लालूप्रसाद यांच्यावर दिल्लीतील शासकीय बंगला रिकामा करण्याची वेळ येऊ शकते. पूर्वीच्या संपुआ सरकारने ‘सामाजिक कार्यकर्ता’ या श्रेणीमध्ये हा बंगला आपल्या ताब्यात ठेवण्याची परवानगी लालूप्रसाद यांना दिलेली होती, अशी माहिती आहे. संजदचे अध्यक्ष शरद यादव हे बिहारमधून राज्यसभेवर निवडले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शरद यादव यांचा लोकसभा निवडणुकीत मधेपुरामधून पराभव झाल्याकारणाने आता त्यांना राज्यसभेची जागा देण्यात येईल, असे सांगितले जाते. नितीशकुमार यांचे विश्वासू मानले जाणारे माजी मुत्सद्दी पवन वर्मा यांच्या नावाचा या दुसर्या जागेसाठी विचार केला जाणार आहे. वर्मा हे अनेक वर्षांपासून संजदचे प्रवक्ते आहेत. याआधी नितीशकुमार यांनीही स्वत: राज्यसभेत जाण्याबाबत विचार केलेला होता. परंतु हा विचार त्यांनी आता बदलला आणि आमदार म्हणून पाटण्यातच राहण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेच्या तिसर्या जागेवर संजदतर्फे एखाद्या मुस्लीम उमेदवाराला उभे केले जाण्याची शक्यता आहे.