महसूल अधिकार्यांना ध्वजारोहणाचा मान
By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:26+5:302015-08-03T22:31:26+5:30

महसूल अधिकार्यांना ध्वजारोहणाचा मान
>आमदार वगळले : शासनाचा नव्याने आदेशनाशिक : आमदार, खासदारांना मानसन्मान देण्याचे गेल्या आठवड्यात आदेश काढणार्या शासनाने मात्र स्वातंत्र्य दिनाचे तालुका पातळीवरील ध्वजारोहण प्रांत अधिकारी, तहसीलदारांच्या हस्ते करण्याचे आदेश काढले आहेत. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा मान मिरवून घेणार्या आमदारांना मात्र नव्या आदेशात डावलण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश प्रशासनाला प्राप्त झाले असून, महसूल अधिकार्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यासाठी शासनाने पहिल्यांदाच आदेश काढले आहेत. एक मे, महाराष्ट्र दिनी तालुका पातळीवरील ध्वजारोहण संबंधित मतदारसंघातील आमदारांच्या हस्ते करण्याचे ठरवून तहसीलदार तसेच प्रांत अधिकार्यांचा हा अधिकार काढून घेण्यात आला होता. आमदारांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण केले होते. तालुका पातळीवरील ध्वजारोहणाचा मान कायमस्वरूपी आमदारांनाच दिला जाईल, अशी अटकळ बांधली जात असतानाच नव्याने आदेश निघाला आहे. मात्र महसूल अधिकार्यांमध्ये असलेल्या छुप्या नाराजीची शासनाने दखल घेऊन सामान्य प्रशासन खात्याच्या राजशिष्टाचार विभागाने दोन दिवसांपूर्वीच नवे आदेश काढल्याची चर्चा आहे.प्रत्येक विभागाच्या मुख्यालयी व जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. मंत्री अनुपस्थित राहिले तर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच ध्वजारोहण सोहळ्यास स्थानिक आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवकांना विशेष निमंत्रित केले जावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)