नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतला आहे. तो पाकिस्तानने परत करणे इतकाच त्याचा काश्मीरशी संबंध आहे, अशा परखड शब्दांत भारताने त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फटकारले आहे. काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले
इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात मंगळवारी मुनीर यांनी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना असे आवाहन केले की, आपल्या भावी पिढ्यांपर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीची व पुढील वाटचालीची कहाणी पोहोचविली पाहिजे. हिंदू व मुस्लिम यांच्यात प्रत्येक गोष्टींत मूलभूत फरक आहे, हे आपल्या पूर्वजांनी सर्वांच्या मनावर ठसविले होते. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, अन्य मंत्री उपस्थित होते.
मुनीर यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, कोणतीही परकी गोष्ट एखाद्याच्या शरीरातील नस कशी काय असू शकते? जम्मू-काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. काश्मीरचा काही प्रदेश पाकिस्तानने बळकावला आहे, इतकाच त्या देशाचा त्या भागाशी संबंध आहे. बळकावलेल्या प्रदेश त्यांनी परत करायला हवा. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे व भविष्यातही हीच स्थिती राहणार आहे. अत्याचारांबाबत माफी मागा
बांगलादेशने १५ वर्षांनंतर पाकबरोबरच्या परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत न सुटलेले मुद्दे उपस्थित करत १९७१च्या अत्याचाराबाबत माफी मागावी, अशी मागणी केली.
‘पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू’
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. त्याची ही प्रतिमा कधीही पुसली जाणार नाही.
मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यर्पण झाले आहे. हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना पाक संरक्षण देत आहे.
या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे पाकिस्तानला या गोष्टीची आठवण नेहमी होत राहणार आहे.
‘पाकिस्तानचा झाला तीळपापड’
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तसेच जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अंगाचा तीळपापड झाला.
दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मंगळवारी सांगितले की, पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धान्त मांडला होता. आपला धर्म, चालीरीती, संस्कृती, विचार वेगळे आहेत. या गोष्टी पाकिस्तानी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.