निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक
By Admin | Updated: February 4, 2016 13:13 IST2016-02-04T13:13:47+5:302016-02-04T13:13:47+5:30
भारतीय लष्करातील निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला जिहादी गटांशी संपर्क असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असून गोव्यातील दहशतवादविरोधी पथक त्याची चौकशी करत आहे.

निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ४ - भारतीय लष्करातील निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला जिहादी गटांशी संपर्क असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असून गोव्यातील दहशतवादविरोधी पथक त्याची चौकशी करत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समीर सरदाना असं या ४४ वर्षीय तरुणाचं नाव असून पोलीसांच्या सांगण्यानुसार तो इस्लाम पाळणारा हिंदू आहे. सोमवारी त्याला वास्को येथे अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या समीरने बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले असून हाँगकाँग, मलेशिया व सौदी अरेबियामध्येही त्याने काम केलं आहे.
वास्को रेल्वे स्थानकामध्ये संशयास्पदरीत्या फिरत असताना त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पाच पासपोर्ट, चार मोबाईल फोन व लॅपटॉप होता. पोलीसांनी या सगळ्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
गुप्तचर विभागाची पथके तसेच दहशतवादविरोधी पथके त्याची चौकशी करत असून वास्कोतल्या न्यायाधीशांनी त्याला पोलीस कोठडी दिली आहे.
समीरने देशात झालेल्या बाँबस्फोटांची माहिती गोळा केली होती, असे दाखवणारी काही पत्रे व ई-मेल पोलीसांना सापडले असून त्यांचा अर्थ लावण्याचे काम सुरू आहे.
डेहराडूनमधल्या पोलीसांनीही गोवा पोलीसांना त्याच्या कुटुंबासंदर्भात आणि त्याच्यासंदर्भात लागणारी माहिती काढण्याचे व सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. समीर हा अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील असून डेहराडूनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हेगारीची नोंद नसल्याचे पोलीसांनी सांगितले. त्याच्यावर ऑनलाइन माध्यमातून कट्टरतावाद बिंबवण्यात आला का या अंगाने तपास करण्यात येत आहे.
पोलीस समीरच्या लॅपटॉपमधून व मोबाईल फोनच्या काँटॅक्टसमधून काही माहिती मिळते का याचा शोध घेत आहे.
दरम्यान, समीरच्या वडिलांनी निवृत्त मेजर जनरल के. एन. सरढाणा यांनी समीरला नाहक अटक केली असल्याचे सांगितले. कुठल्याही बेकायदेशीर कृत्यात तो गुंतला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याच्या बाबतीत अत्यंत खासगी स्वरुपाच्या गोष्टी आहेत, ज्या आम्ही प्रसारमाध्यमांना सांगू शकत नाही असेही ते म्हणाले.