अंध देशभक्तीच्या भावनेला लगाम घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2015 02:32 IST2015-06-17T02:32:10+5:302015-06-17T02:32:10+5:30
म्यानमारमधील लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अंध देशभक्तीची भावना भडकवणारी विधाने

अंध देशभक्तीच्या भावनेला लगाम घाला
नवी दिल्ली : म्यानमारमधील लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अंध देशभक्तीची भावना भडकवणारी विधाने केल्याबद्दल विचारवंतांच्या गटाने जोरदार टीका केली आहे. अशा भावनेला प्रोत्साहन देणे विचारहीन अभिव्यक्ती ठरते, असा सूरही त्यांनी व्यक्त केला.
सरकारमधील लोकांनी अशी विधाने करण्यापासून दूर राहावे. पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी मिळणाऱ्या पहिल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.
पत्रकार, राजकारणी, नामवंत वकील आदींचा समावेश असलेल्या या गटाचा राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केलेल्या वक्तव्याकडे रोख होता.
म्यानमारमधील अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारत असेच हल्ले करू शकतो, असे राठोड यांनी म्हटले होते. सरकारचे प्रतिनिधी, सत्तारूढ भाजपचे प्रतिष्ठित प्रवक्ते, तसेच धोरणात्मक निर्णयाशी संबंधित बौद्धिक संघटनांनी अंध देशभक्तीच्या भावनेला खतपाणी घालण्यासाठी केलेली अविवेकी भाषा ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे या गटाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)