२५ डिसेंबरची घरवापसी रद्द, पण धर्मांतर आधीच झाल्याचं स्पष्ट
By Admin | Updated: December 17, 2014 15:41 IST2014-12-17T15:41:36+5:302014-12-17T15:41:36+5:30
डिसेंबर २५ रोजी अलीगढमध्ये ४०० मुस्लीमांचा घरवापसी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे धर्म जागरण मंचाने जाहीर केले आहे.

२५ डिसेंबरची घरवापसी रद्द, पण धर्मांतर आधीच झाल्याचं स्पष्ट
>लोकमत ऑनलाइन
अलीगढ (उत्तर प्रदेश), दि. १७ - डिसेंबर २५ रोजी अलीगढमध्ये ४०० मुस्लीमांचा घरवापसी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे धर्म जागरण मंचाने जाहीर केले आहे. अर्थात, या मुस्लीमांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून त्यांचे त्यांच्या मूळच्या समाजासमोर स्वागत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असेही मंचाने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. जिल्हा प्रशासनाने धमकावल्यामुळे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी सूचना केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मंचाच्या कार्यकर्तायंनी सांगितले. प्रसारमाध्यमांतून, फोन करून तसेच अटक करण्याच्या धमक्या देत जिल्हा प्रशासनाने मंचाच्या कार्यकरत्यांना धमकावल्याचे मंचाने म्हटले आहे. आम्ही घरवापसी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असली तरी यामुळे तसेच आरएसएसच्या ज्येष्ठांनी सांगितल्यामुळे आपण हा घरवापसीचा कार्यक्रम रद्द करत असल्याचे मंचाचे पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रमुख राजेश्वर सिंग यांनी सांगितले.
मूळचे राजपूत असलेल्या व अनेक वर्षांपूर्वी मुस्लीम झालेल्या ४०० जणांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. या सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते असे ते म्हणाले. पुन्हा हिंदुधर्मात आलेल्या या व्यक्ती बुलंदशहर, अलीगड, मथुरा, हाथरस, इटाह, आग्रा व बदाऊन इथल्या असल्याचेही राजेश्वर सिंग म्हणाले. लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी समज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यानंतर काही तासांमध्येच हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला. अर्थात, आत्ता रद्द झालेला हा घरवापसी कार्यक्रम नंतर करू व वेगळ्या ठिकाणी करू असेही सिंग म्हणतात.