नापासांची जुलैमध्ये फेरपरीक्षा!

By Admin | Updated: June 12, 2015 05:38 IST2015-06-12T05:38:31+5:302015-06-12T05:38:31+5:30

मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार

Representation failed in July! | नापासांची जुलैमध्ये फेरपरीक्षा!

नापासांची जुलैमध्ये फेरपरीक्षा!

मुंबई : मार्च २०१५मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५च्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असून, २० आॅगस्टदरम्यान निकाल जाहीर करण्यात येईल. १ सप्टेंबरपासून त्यांचा पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
तावडे म्हणाले की, नापास विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया घालविण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे त्यांना अजून एक संधी लगेचच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यंदा सुमारे दीड लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; त्यांना या परीक्षेस बसून आपले वर्ष वाचविण्याची संधी यानिमित्ताने मिळत आहे.  येत्या १५ जूनपासून अर्ज स्वीकारले जातील. १५ जुलै दरम्यान प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होऊन आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल घोषित होईल. यामुळे आॅक्टोबरमध्ये होणारी परीक्षा बंद होईल, असे तावडे यांनी सांगितले.
५० टक्के निकाल लागलेल्या शाळांची बैठक
राज्यातील सुमारे ३५० शाळांचे निकाल ५० टक्क्यांहून कमी लागले आहेत. अशा शाळांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांची बैठक बोलविणार असून संबंधित शाळांना कोणत्या अडचणी आहेत, या शाळांचा निकाल कमी का लागला? याबाबत सविस्तर चर्चा जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येईल, असे तावडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Representation failed in July!