व्यापमं घोटाळा उजेडात आणणाऱ्या डॉक्टरची बदली
By Admin | Updated: July 21, 2015 00:27 IST2015-07-21T00:27:41+5:302015-07-21T00:27:41+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा यांची अलीकडेच सीबीआयकडे तक्रार करणारे जागले कार्यकर्ते (व्हिसलब्लोअर) सरकारी डॉक्टर आनंद

व्यापमं घोटाळा उजेडात आणणाऱ्या डॉक्टरची बदली
भोपाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा यांची अलीकडेच सीबीआयकडे तक्रार करणारे जागले कार्यकर्ते (व्हिसलब्लोअर) सरकारी डॉक्टर आनंद राय यांच्यावर बदलीची कुऱ्हाड कोसळली आहे. मध्यप्रदेश सरकारने रविवारी त्यांची तडकाफडकी इंदूरहून धर जिल्ह्यात बदली करणारा आदेश जारी केला.
वर्मा यांनी मुलीला गाझियाबादच्या संतोष वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर भोपाळच्या गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तिला बदली प्रवेश मिळवून देताना आपल्या राजकीय प्रभावाचा वापर केल्याचा आरोप राय यांनी सीबीआयकडे दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. व्यापमं घोटाळा उघडकीस आणणाऱ्यांपैकी एक असलेले राय हे इंदूरच्या आरोग्य प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. गेल्याच महिन्यात सरकारी डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नी गौरी यांची महू येथील नागरी रुग्णालयातून उज्जैन जिल्ह्यात बदली करण्यात आली. बदलीमुळे विचलित न होता राय यांनी न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे. त्यांनी १७ जुलै रोजी वर्मा यांच्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार
व्हिसलब्लोअरपैकी असलेले अन्य एक कार्यकर्ते आशिष चुतर्वेदी यांनी राय आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना पत्र पाठविणार असल्याची माहिती दिली. (वृत्तसंस्था)