SL Bhyrappa: प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी बेंगळुरू येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. भैरप्पा यांना बंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रुग्णालयाच्या प्रेस रिलीजनुसार, भैरप्पा यांना दुपारी २:३८ वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
संथेशीवर लिंगन्नय्या भैरप्पा यांना एस.एल. भैरप्पा म्हणून ओळखले जात होते. ते एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार, तत्वज्ञानी आणि पटकथा लेखक होते. पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित एस. एल. भैरप्पा हे भारतीय साहित्यातील एक मोठे नाव होते. २० ऑगस्ट १९३१ रोजी कर्नाटकातील हसन येथे जन्मलेले भैरप्पा हे २५ वर्षांहून अधिक काळ कन्नड भाषेतील सर्वाधिक प्रसिद्ध लेखकांपैकी एक होते. त्यांच्या अनेक कामांचे हिंदी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या एक्स अकाउंटवरुन एस.एल. भैरप्पा यांना श्रद्धांजली वाहिली. "एस.एल. भैरप्पा यांच्या निधनाने आपण एक उत्तुंग व्यक्तिमत्व गमावले आहे ज्यांनी आपल्या विवेकाला जागृत केले आणि भारताच्या आत्म्याला स्पर्श केला. एक निर्भय आणि कालातीत विचारवंत, त्यांनी आपल्या विचारप्रवर्तक कृतींनी कन्नड साहित्य समृद्ध केले. त्यांच्या लेखनाने पिढ्यांना समाजात चिंतन करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि अधिक खोलवर सहभागी होण्यास प्रेरित केले. आपल्या इतिहास आणि संस्कृतीबद्दलची त्यांची अढळ आवड येणाऱ्या अनेक वर्षांपासून लोकांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसोबत माझी संवेदना आहे. ओम शांती," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
एस एल भैरप्पा यांनी वंशवृक्ष, दाटू, पर्व, मंदरा आणि गृहभंग या प्रसिद्ध कन्नड कादंबऱ्या लिहिल्या. भैरप्पा यांची पहिली कादंबरी भीमकाया १९५८ मध्ये प्रकाशित झाली. तेव्हापासून भैरप्पा यांनी जवळपास २५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ एनसीइआरटी येथे तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. एसएल भैरप्पा यांना २०१५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२३ मध्ये, भारत सरकारने भैरप्पा यांना साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.