दिलासादायक... आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही
By Admin | Updated: December 10, 2014 15:09 IST2014-12-10T14:52:57+5:302014-12-10T15:09:54+5:30
आत्महत्येचा प्रयत्न करणे हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांना गुन्हेगार ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

दिलासादायक... आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - आत्महत्येचा प्रयत्न करणे हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांना गुन्हेगार ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
गृह राज्य मंत्री किरण रिजीजू यांनी ऑगस्टमध्ये लोकसभेत उत्तर देताना कायदा समितीने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरवणारा कलम वगळण्याची शिफारस केल्याचे म्हटले होते. यानंतर केंद्र सरकारने हा कायदा रद्द करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. १८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेशांनी हा कायदा रद्द करण्यास पाठिंबा दिल्याचे केंद्र सरकारने सांगितले. आता संसदेतील दोन्ही सभागृहासमोर हा प्रस्ताव मांडला जाणार असून दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा रद्द होऊ शकेल. यासाठी किती अवधी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आयपीसीतील कलम ३०९ अंतगर्त आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा असून यात दोषी आढळल्यास एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती आधीच मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याने ते आत्महत्येचा पर्याय निवडतात. आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्यांना शिक्षा ठोठावून त्यांच्यावर अन्यायच केला जातो आणि म्हणूनच हे कलमच रद्द करावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटना करत होत्या.