रेल्वे भाडेवाढीवर दिलासा
By Admin | Updated: June 25, 2014 10:35 IST2014-06-24T21:50:03+5:302014-06-25T10:35:38+5:30
मुंबईची जीवनरेखा असलेल्या लोकलची भरमसाठ भाडेवाढ कमी करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी महायुतीच्या शिष्टमंडळास दिले.

रेल्वे भाडेवाढीवर दिलासा
रघुनाथ पांडे
नवी दिल्ली : मुंबईची जीवनरेखा असलेल्या लोकलची भरमसाठ भाडेवाढ कमी करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी महायुतीच्या शिष्टमंडळास दिले आणि रेल भवनातील या शिष्टाईला काही तासही उलटत नाहीत तोच १०० टक्के (सेकंड क्लास) आणि २०० टक्के (फर्स्ट क्लास) अशी प्रस्तावित जबर भाडेवाढ १४.२ टक्क्यांवर आणल्याचे मुंबईत रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले. उपनगरीय सेकंड क्लासपुरती ८० किमीपर्यंत ही भाडेवाढ लागू नसल्याचेही स्पष्ट केले. पण उपनगरीय प्रवाशांना मिळालेला हा दिलासा देशभरात सरसकट सर्व प्रवाशांना लागू आहे काय, याचा खुलासा रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता.
एकीकडे या भाडेवाढीच्या विरोधात राजकीय शिष्टाई सुरु असताना दुसरीकडे हा जनआक्रोश मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. दिल्लीत नुसतेच आश्वासन आणि न्यायालयात स्थगितीच्या आशेवर पाणी अशी स्थिती मंगळवारी होती. न्यायालयाने मुंबई ग्राहक पंचायत आणि केतन तिरोडकर यांच्या स्वतंत्र याचिकांवर भाडेवाढीला स्थगिती देण्यास नकार देत ३ जुलैला पुढील सुनावणी ठेवली. त्याचवेळी उच्च न्यायालयाने प्रवाशांना सुधारित चढ्या दराने खरेदी केलेल ेतिकीट व पास जपून ठेवण्याचा सल्ला दिला आहे़ यदाकदाचित केंद्र सरकारने दर कमी केल्यास प्रवाशांना त्यांनी मोजलेले अधिक पैसे परत मिळू शकतात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे़
रेल्वे अर्थसंकल्प ८ जुलै रोजी सादर होत आहे. त्यावेळी यावर अंतिम निर्णय होईल. मुंबईच्या रेल्वे विकासाचा प्रस्ताव तयार करून त्यातून दरवाढ कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे होते. तथापि महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही रेल्वे मंत्र्यांना संतप्त भावना पटवून देण्यात यशस्वी झालो, सरकार फेरविचार करणार आहे, त्यामुळे पाच दिवसात मुंबईच्या प्रवाशांना आवडेल असा मोठा निर्णय होईल. पण कपातीचा तपशील ते सांगू शकले नव्हते.
महायुतीच्या मुंबई- ठाण्यातील १० खासदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी रेल्वेमंत्र्यांची रेल भवनात भेट घेतली. यावेळी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिंन्हा, ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, विनोद तावडे, गोपाल शेट्टी, किरीट सोमया, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, पुनम महाजन, श्रीकांत शिंदे, आशिष शेलार आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपा व शिवसेनेच्यावतीने दोन वेगवेगळी निवेदने गौडा यांना दिली गेली. त्यामध्ये रेल्वेचे रखडलेले प्रश्न, समस्या, सुविधा आदी समावेश आहे.
भाडेवाढीच्या निर्णयाने मुंबईकर कमालीचे दुखावल्याची भावना, शिष्टमंडळाने गौडा यांच्या कानावर घातली. आपल्याला खासदार म्हणून काय काय ऐकावे लागते तेही ऐकविले. लोक फोन करून कधी होणार दरवाढ कमी, असे विचारतात, हेच का तुमचे अच्छे दिन असेही बोलतात त्यांना कोणते उत्तर द्यावे ते आता तुम्हीच सांगा, असेही जोरकसपणे शिष्टमंडळातील काहींनी मंत्र्याना सांगितले. अर्थमंत्री अरु ण जेटली यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची तयारी दाखवल्याने व तावडे यांनी तसे तपशील जेटली यांना दिल्याने शिष्टमंडळाच्या आजच्या भेटीचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात चांगले दिसू शकते, अशी आशा आहे. जेटली यांनीच तातडीने गौडा यांना भेटा असे सूचित केल्याचे सांगण्यात येते. महायुतीचे शिष्टमंडळ रेल्वे मंत्र्यांना भेटले असे सांगितले गेले तरी या विषयाची पत्रकार परिषद तावडे यांनीच घेतली. खा. गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते, मात्र शिष्टमंडळातील शिवसेनेचे कोणतेच खासदार व रामदास आठवले तेथे नव्हते.
---
या भाडेवाढीचा कोणताही परिणाम आगामी निवडणुकीवर होणार नाही. मोदी सरकार आल्याने एकदम स्वस्ताई येणार नाही. दोन तीन वर्षे लागतील. - विनोद तावडे, विरोधी पक्षनेते
----
मुंबईत रेल्वेच्या खूप समस्या आहेत. त्यासाठी पैसा लागणार आहे. पण म्हणून प्रवाश्यांचे खिसे कापू नका. हे आपण रेल्वे मंत्र्यांना सांगितले. लगेच निर्णय होणार नाही, पण चांगला निर्णय घेऊ असे ते म्हणाले. - रामदास आठवले, खासदार
---
दरवाढीचा विरोध करणार शिवसेना खासदारांच्या सहीचे एक स्वतंत्र निवेदन आपण रेल्वे मंत्र्यांना दिले. आधी सुविधा द्या, सुरक्षा द्या मगच भाडेवाढ करा. - गजानन कीर्तीकर शिवसेना खासदार