Operation Sindoor: पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत केलेले प्रत्युत्तर, पाकिस्तानने भारतीय ठिकाणांवर केलेले हल्ले आणि भारतीय सैन्याने दिलेले जशास तसे उत्तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सज्जड दम दिला. परंतु, यानंतर अवघ्या काहीच वेळात पाकिस्तानने जम्मू काश्मीर येथील सांबा येथे ड्रोन हल्ले केल्याचे सांगितले जात आहे.
दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही. न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन केले जाणार नाही. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित केले आहे, थांबवलेले नाही. पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या, तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले. पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच जम्मू काश्मीर येथील सांबा येथील काही भागांत ड्रोन हल्ले झाल्याचे समोर आले आहे. भारतीय सैन्याने हे सगळे हल्ले परतवून लावले आहेत.
त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, काळजीचे काही कारण नाही
भारतीय सैन्यातील सूत्रांनी म्हटले आहे की, तुलनेने सांबा सेक्टरमध्ये खूप कमी ड्रोन दिसले आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पंजाबमधील अमृतसर येथे ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. दसुया आणि मुकेरियन भागात काही काळासाठी खबरदारी म्हणून अंशतः वीजपुरवठा बंद करण्याची घोषणा करत आहोत. होशियारपूरच्या रहिवाशांना आवाहन करत आहोत की, त्यांनी स्वतःहून वीजपुरवठा बंद करावा आणि घरातच राहावे. घाबरण्याचे काही कारण नाही, असे होशियारपूरच्या उपायुक्त आशिका जैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला भारतीय वायू सेनेने चोख उत्तर दिले. सांबा येथे ब्लॅकआऊट करण्यात आले होते. यानंतर आकाशात ड्रोन दिसले आणि स्फोटांचे आवाजही ऐकू आले, असे सांगितले जात आहे.