लाल किल्ल्यावर आयोजित एका धामिर्क कार्यक्रमात शिरकाव करून एका व्यक्तीने तब्बल १ कोटींचा कलश चोरून नेल्याची घटना चांगलीच चर्चेत आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आला होता. यानंतर पोलिसांनी ही चोरी करणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले आणि त्याच्याकडून हा कलश देखील जप्त केला. मात्र, या व्यक्तीने पुजाऱ्याचा वेश धारण करून ही चोरी का केली, याचे कारण आता समोर आले आहे. हे कारण ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
लाल किल्ल्यातील कार्यक्रमातून एक नव्हे तर, तीन कलश चोरीला गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. जैन समुदायाच्या धार्मिक विधीतून हे दोन कोटी किमतीचे कलश चोरीला गेले होते. आता उत्तर प्रदेशातील हापूर पोलिसांनी कलश चोरीच्या या प्रकरणात मास्टरमाइंडसह तीन आरोपींना अटक केली आहे. यासोबतच चोरीला गेलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
कलश चोरी प्रकरणात रविवारी रात्री तिघांनाही अटक करण्यात आली. या चोरीचा मुख्य सूत्रधार भूषण वर्मा आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या गावी असौदा येथून अटक केली. भूषणच्या पश्चात त्याची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो गेल्या एक वर्षापासून शहरातील वैशाली कॉलनीत त्याच्या कुटुंबासह राहत होता. यापूर्वी तो श्रीनगर मोहल्लाचा रहिवासी होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी भूषणने त्याचे घर आणि पत्ता बदलला होता. कारण त्याच्या शेजाऱ्यांना तो चोर असल्याचे कळले होते. त्याचे गुपित उघड होईल या भीतीने त्याने आपले घर बदलले होते.
का केली चोरी?भूषणने पोलिसांना सांगितले की, तो त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करत होता. यासाठीच त्याने ते कलश चोरले आणि विकण्याची योजना आखली. त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न दोन महिन्यांनी आहे. वैशाली कॉलनीतील लोकांनी सांगितले की, त्यांना भूषणबद्दल फारशी माहिती नव्हती. लोकांना फक्त त्याच्या सोनाराच्या कामाबद्दल माहिती होती. मात्र, भूषण हा प्रामुख्याने ड्रायव्हर होता. गेल्या वर्षी त्याने दिल्लीच्या लाल मंदिर आणि अशोक विहारमधील मंदिरातून कलश चोरले होते. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. २०१६ मध्ये चोरीच्या प्रकरणात तो आधीच तुरुंगात गेला होता.
सगळ्यावर नजर ठेवून होता आरोपी!पोलिसांनी सांगितले की, भूषण वर्मा याचे लक्ष्य फक्त जैन समुदायातील धार्मिक कार्यक्रम होते. कारण जैन समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे कलश सोन्याचे बनलेले असतात आणि रत्नांनी जडवलेले असतात. म्हणूनच तो सेवेकरी किंवा पुजारी म्हणून कार्यक्रमांना जायचा. नंतर तो रेकी करायचा आणि चोरी करायचा. ३ सप्टेंबर रोजी लाल किल्ला पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमातून ७६० ग्रॅम सोने आणि १५० ग्रॅम हिरे जडवलेला कलश आणि शुद्ध सोन्याचे दोन कलश चोरून आरोपी फरार झाले होते.