Red Fort Blast:दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटाचा तपास करणाऱ्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील नवव्या संशयित आरोपीला, यासिर अहमद डार याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. यासिर हा मूळचा काश्मीरमधील शोपियानचा रहिवासी असून, तो या संपूर्ण कटातील मुख्य दुवा असल्याचे समोर आले आहे.
स्वत:ला उडवून देण्याची घेतली होती शपथ
एनआयएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, यासिर अहमद डार हा केवळ कटात सामील नव्हता, तर त्याने दहशतवादी संघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. धक्कादायक म्हणजे, त्याने भविष्यात फिदायीन हल्ले करण्यासाठी स्वतःला तयार केले होते. तो या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी आणि स्फोटके असलेली कार चालवणारा उमर-उन-नबी याच्या सतत संपर्कात होता.
सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमरचा खरा चेहरा
तपासादरम्यान आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर याचा एक १ मिनिट २० सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये उमर सुसाईड बॉम्बिंगचे समर्थन करताना दिसत आहे. आत्मघाती हल्ला हा मृत्यू नसून शहीद होण्याचा मार्ग आहे, असं तो व्हिडीओमध्ये म्हणत होता.
डॉ. उमर हा पुलवामाचा रहिवासी होता. तो शांत आणि अभ्यासू मुलगा म्हणून ओळखला जात असे, मात्र गेल्या काही महिन्यांत त्याचे पूर्णपणे ब्रेनवॉश करण्यात आले होते. त्याने फरीदाबाद आणि दिल्लीमध्ये राहून रामलीला मैदान आणि लाल किल्ल्याची रेकी केली होती. ३० ऑक्टोबरपासून त्याने कामावर जाणे बंद करून या हल्ल्याची तयारी सुरू केली होती.
NIA चा मोठा तपास आणि धाडसत्र
डिसेंबर २०२५ च्या सुरुवातीला एनआयएने जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठी शोधमोहीम राबवली होती. मुख्य आरोपी डॉ. मुजम्मिल शकील गनी आणि डॉ. शाहीन सईद यांच्या फरीदाबाद आणि युनिव्हर्सिटी कॉम्प्लेक्समधील ठिकाणांवर छापे टाकून अनेक डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.यासिरच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण अटकेची संख्या नऊवर पोहोचली आहे.
Web Summary : NIA arrested Yasir Ahmed Dar, a Kashmiri man, in connection with the Red Fort blast case. Dar pledged allegiance to a terrorist group and prepared for suicide attacks. He was in contact with another key suspect, Dr. Umar, who advocated suicide bombings in a video.
Web Summary : एनआईए ने लाल किला विस्फोट मामले में यासिर अहमद डार नामक एक कश्मीरी व्यक्ति को गिरफ्तार किया। डार ने एक आतंकवादी समूह के प्रति निष्ठा की शपथ ली और आत्मघाती हमलों की तैयारी की। वह एक अन्य प्रमुख संदिग्ध डॉ. उमर के संपर्क में था, जिसने एक वीडियो में आत्मघाती बम विस्फोटों की वकालत की।