आयआयटी प्रवेश परीक्षेपूर्वी कल चाचणीची शिफारस
By Admin | Updated: November 8, 2015 00:06 IST2015-11-08T00:06:54+5:302015-11-08T00:06:54+5:30
प्रतिष्ठेच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट््स आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये (आयआयटी) प्रवेशासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा आणि त्या अनुषंगाने वाढलेले

आयआयटी प्रवेश परीक्षेपूर्वी कल चाचणीची शिफारस
नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट््स आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये (आयआयटी) प्रवेशासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा आणि त्या अनुषंगाने वाढलेले कोचिंग क्लासेसचे प्रस्थ कमी करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) घेण्यापूर्वी प्रवेशेच्छुंची कल चाचणी (अॅप्टीट्यूट टेस्ट) घेण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे.
सध्याच्या ‘जेईई’ परीक्षा पद्धतीत बदल सुचविण्यासाठी आयआयटी कौन्सिलने मुंबई आयआयटीचे संचालक प्रा. अशोक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर व्यक्तींची समिती नेमली होती. समितीने अहवाल सरकारला सादर केला. या शिफारशी सर्व संबंधितांकडून मते घेण्यासाठी जाहीर करण्यात आल्या असून त्यानंतर ‘जेईई’च्या विद्यमान स्वरूपात जे काही मोठे बदल करायचे ते वर्ष २०१७ पासून पुढील कालासाठी करण्याचे ठरविले आहे. फक्त यावेळी ‘जेईई (अॅडव्हान्स्ड)ला दीडऐवजी दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच ‘जेईई (मेन) परीक्षेत शालांत परीक्षा मंडळांच्या परीक्षेतील गुणांना दिले जाणारे ‘वेटेज’ कायम असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
समितीने केलेल्या प्रमुख शिफारशी अशा
जेईई परीक्षेपूर्वी प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक कल आणि चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता जोखण्यासाठी ‘अॅप्टीट्यूट टेस्ट’ घेतली जावी.
अशी अॅप्टीट्यूट टेस्ट घेण्यासाठी एक राष्ट्रीय टेस्टिंग सर्व्हिस स्थापन केली जावी. ही टेस्ट आॅनलाईन पद्धतीने वर्षातून दोनदा घेतली जावी. ज्यात कोचिंग क्लासचा काही उपयोग होणार नाही, अशी ही चाचणी असावी.
या अॅप्टीट्यूट टेस्टमधील कामगिरीच्या आधारे जेईई परीक्षेला बसण्यास पात्र अशा सुमारे चार लाख परीक्षार्थींची निवड केली जावी.
‘जेईई’ परीक्षा ‘मेन’ व ’अॅडव्हान्स्ड’ अशा दोन टप्प्यांत न घेता ‘जेईई अॅडव्हान्स्ड’च्या धर्तीवर एकाच टप्प्यात घेतली जावी. ही परीक्षा त्या आयआयटींनी घ्यावी व मुख्यत्वे पदार्थविज्ञान, रसायनसास्त्र व गणिताचे ज्ञान त्यात तपासले जावे.
या परीक्षेतून सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना गुणवत्ताक्रम (रँक) देऊन प्रवेश दिले जावेत.
कोचिंग क्लासच्या कुबड्या न घेता विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेची तयारी स्वत:हून चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी आयआयटींनी अभिरूप जेईई परीक्षा घेण्याची व्यवस्था विकसित करावी.
यासाठी ‘एमओओसीएस’ प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्याची शक्यताही तपासून पाहावी.
मुळातच विज्ञानाकडे कल असणारे विद्यार्थी इयत्त १२वी ला येईपर्यंत, त्यांची कोचिंग क्लास न लावताही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची चांगली तयारी व्हावी यासाठी राज्यांच्या शिक्षण मंडळांचे पाठ्यक्रम व परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उपाय योजावेत.
हे होईपर्यंत म्हणजे वर्ष २०१६ व २०१७ साठी सध्याची द्विस्तरीय जेईई परीक्षा पद्धती सुरु ठेवावी.
जेईई मेन परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या दोन लाख विद्यार्थ्यांनाच जेईई (अॅडव्हान्स्ड) परीक्षेला बसू द्यावे.