रिएलिटी शोपायी अल्पवयीन प्रेमी युगूलाने केली हत्या
By Admin | Updated: September 25, 2015 21:37 IST2015-09-25T21:37:07+5:302015-09-25T21:37:07+5:30
हिंदी वाहिनीवरील एका ख्यातनाम रिएलिटी शोमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीतील अल्पवयीन प्रेमी युगूलाने १३ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रिएलिटी शोपायी अल्पवयीन प्रेमी युगूलाने केली हत्या
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - हिंदी वाहिनीवरील एका ख्यातनाम रिएलिटी शोमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीतील अल्पवयीन प्रेमी युगूलाने १३ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण करुन ६० हजार रुपयांची खंडणी मागण्याचा कट या युगूलाने रचला होता.
दिल्लीतील जैतपूर येथे राहणा-या स्वप्नेश गुप्ता हा १३ वर्षाचा मुलगा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. यानंतर गुप्ता कुटुंबीयांना खंडणीसाठी फोन येत होते. पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अपहरणकर्त्यांनी ६० हजार रुपये घेऊन फरिदाबादमधील निर्जनस्थळी बोलवले होते. पोलिसांनीही तिथे सापळा रचला पण अपहरणकर्त्यांना बघून पोलिसही हादरले. स्वप्नेशचे अपहरण जैतपूरमध्ये राहणा-या एका अल्पवयीन प्रेमी युगूलाने केले होते.
संबंधीत प्रेमी युगूलाची एका डान्स रिएलिटी शोमध्ये निवड झाली होती. पण तीन टप्प्यानंतर ते रिएलिटी शोमधून बाद झाले होते. शोमध्ये परत यायचे असेल तर ६० हजार रुपये द्यावे लागतील असे त्यांना एकाने सांगितले होते. हे पैसे जमवण्यासाठीच या प्रेमी युगूलाने चक्क १३ वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला. पोलिसांसमोर बनाव उघड होऊ नये यासाठी पैसे घेण्यापूर्वीच त्यांनी मुलाची गळा आवळून हत्या केली होती.