वाचक संवाद -

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30

आग्वादात कॅसिनो नकोच!

Reader communication - | वाचक संवाद -

वाचक संवाद -

्वादात कॅसिनो नकोच!
मांडवी नदीतील कॅसिनो अन्यत्र स्थलांतरित करण्याचा शासनाचा मानस आहे. याचा अर्थ असा की, गोव्यातून कॅसिनोची हद्दपारी होणे नाही. आग्वाद येथील किल्ल्याजवळील जागा प्रस्तावित स्थळांपैकी एक आहे, हे वाचून फार राग आला. आग्वाद किल्ला हा वारसास्थळ आहे व गोव्याच्या इतिहासात त्याला मोठे स्थान आहे. तसेच आग्वादमध्येच अनेक स्वातंत्र्यसैनिक मंडळींना डांबून ठेवण्यात येऊन त्यांचा छळ केला गेला. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आग्वाद पवित्र वास्तू बनली आहे. गोमंतभूच्या अस्मितेचा हा तुकडा कॅसिनोवाल्यांच्या घशात घालण्याइतके कोडगे व नालायक आमचे सरकार बनले का?
- प्रदीप दिवाकर भाटे, कुडका-तिसवाडी
---------------------
फोंडा शहरासाठी मलनिस्सारण व सांडपाणी व्यवस्थापन ही एक महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झालेला आहे. तरी या प्रकल्पाच्या निर्मितीत किती प्रगती झालेली आहे या विषयीची माहिती मीडियाला द्यावी, अशी विनंती नगरपालिका प्रशासनाला करावीशी वाटते. त्याचबरोबर या प्रकल्पाविषयी अद्ययावत माहिती फोंड्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या येत्या स्वातंत्र्यदिनी द्यावी, अशी सूचना करावीशी वाटते.
- र्शीधर खानोलकर, फोंडा-गोवा
------------------
खंवटेंची सूचना पाळावीच
गोवा विधानसभेत बोलताना पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी अशी सूचना केली की शासकीय पदांकरिता घेतल्या जाणार्‍या मुलाखतींची रिकॉर्डिंग केली जावी. ही सूचना स्वागतार्ह आहे. मुलाखतींच्या नावाखाली लायक उमेदवार नाकारण्याचे प्रकार कैकवेळा घडतात. राज्य सरकारच्या बहुतेक स्पर्धा परीक्षा निश्चित फेरी व मुलाखत फेरी या दोन स्तरांवर होतात. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच मुलाखत देता येते व मुलाखत फेरी ही निवड प्रक्रियेतील अखेरची पायरी असते; परंतु बर्‍याच वेळी लेखी परीक्षेत अव्वल येणार्‍या उमेदवारांनाही मुलाखतीत मुद्दाम अत्यंत कमी गुण देऊन पद नाकारण्यात येते. गोवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत व तत्सम राज्यस्तरीय निवडीत अनेक उमेदवारांना हा अन्याय सोसावा लागतो; परंतु निवड समितीतील अधिकार्‍याच्या सूडाचे बळी हे आपण होऊ, अशी भीती बाळगून अनेक जण मुकाट्याने हा अन्याय सोसतात. तेव्हा खंवटेची सूचना लागू करावी, जेणेकरून पारदर्शकता येईल.
- श. भा. नागझरकर, आके-मडगाव
--------
‘काव्यहोत्र’ यशस्वी झाले?
‘काव्यहोत्र’ हे सलग 48 तासांचे कविसंमेलन कला अकादमीमध्ये झाले. हे संमेलन कला अकादमी, कला आणि संस्कृती खाते व पर्यटन खाते यांनी आयोजित केले होते. तेही सरकारी खर्चाने, म्हणजे गोव्यातील कवींना ?ाचा पूर्ण लाभ व्हायला पाहिजे होता. गोव्यातील प्रतिथयश कवींची लक्षणीय उपस्थिती नव्हती; कारण काय ते समजले नाही. कोकणीमध्ये तसेच मराठीमध्ये दर्जेदार कविता लिहिणारे कवी आहेत. इतर राज्यांतून आलेल्या कवींना व काव्यरसिकांना गोव्यातील दर्जेदार कवितेची या निमित्ताने ओळख व्हायला पाहिजे होती; पण तसे झाल्याचे अजिबात दिसले नाही. बरे, या काव्यहोत्रामध्ये किती प्रतिथयश कवी उपस्थित होते? मग ते कुठल्याही भाषेचे असो. हा कवितेचा उत्सव होता. काव्यरसिकांना दर्जेदार कवितांची मेजवानी मिळायला पाहिजे होती. सुमार दर्जाच्या कवितेची नव्हे. काव्यहोत्र हा एक स्तुत्य उपक्रम, एक चांगली संकल्पना! पण या काव्यहोत्रामुळे निदान माझ्यातरी मते गोमंतकीय कवितेला फायदा झाला नाही. असेच नाईलाजाने म्हणावे लागते. मग काव्यहोत्राने नक्की कोणाला फायदा करून दिला? हा प्रश्न निरुत्तरीत! आणखी एक महत्त्वाचे म्हणजे या कविसंमेलनावर एकूण किती खर्च झाला आणि हा झालेला खर्च रास्त होता का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विष्णू वाघांचे काव्यहोत्रासाठी विधानसभेत अभिनंदनही करण्यात आले. दर्जेदार कोकणी कवितेशिवाय या कवितेचा उत्सव संपन्न झाला म्हणून हा अभिनंदनाचा वर्षाव का?
- सर्वानंद नाईक, गोवा
------------
पाकिस्तानच्या मुजोरीला प्रत्युत्तर द्या
मुजोर पाकिस्तानने भारतीय स्वातंत्र्यदिनी केलेल्या तुफान गोळीबारात एकूण नऊ भारतीय नागरिक ठार झाले. पाकिस्तानच्या कुरापती हल्ली वाढत चालल्याचे चित्र दिसते. भारताच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देण्याची आगळीक पाककडून वरचेवर होत आहे. यात सीमावर्ती भागातील निष्पाप नागरिकांचा वारंवार बळी जात आहे. रात्रं-दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अशारितीने अघोषित शितयुद्ध सुरू आहे.
युद्धाचे दुष्परिणाम प्रत्येक देश ओळखून आहे. युद्ध हा अंतिम पर्याय असला तरी रोजचे मरण पत्करण्यापेक्षा शत्रूला पुन्हा एकदा राष्ट्रीय बाणा दाखविण्याची वेळ आली आहे. देशाचा आत्मसन्मान जपणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. विनाकारण कोणी तुमची खोडी काढत असेल तर त्याचे थोबाड फोडलेच पाहिजे. नापाक घटकांनी निष्पाप भारतीयांना गोळ्या घालून ठार करावे, हा राष्ट्रघातकीपणा आहे. शौर्य, त्याग, अतुलनीय पराक्रम, राष्ट्रनिष्ठा यांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून आपल्या सैनिकाकडे पाहिले जाते.
माझ्या परिचयातील एका निवृत्त कॅप्टनने नुकतेच मला सांगितले की, समोरून हल्ला होताना ‘फायर अँण्ड शूट’चा अधिकार नसल्यानेच ही परिस्थिती ओढवत आहे. ‘दुध माँगे तो खीर देंगे, लेकिन वतन माँगोगे तो चीर देंगे’ हा भारतीय लष्कराचा बाणा आपण अनेक युद्धात अनुभवला आहे. शत्रूच्या भ्याड हल्ल्यामुळे निष्पाप नागरिक व शूर जवानांचा हकनाक बळी जात आहे. ‘जिंकू किंवा मरू’ या आवेशाने रणभूमीवर देशासाठी लढता लढता शहीद होण्याची किंमत करता येत नाही. शत्रू राष्ट्र जरी अणुयुद्धाच्या पोकळ धमक्या देत असले तरी, जबरदस्त तडाका दिल्याशिवाय त्यांच्या नापाक कुरापती थांबणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
- सुभाष पंढरी देसाई, केपे

Web Title: Reader communication -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.