रजा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: July 16, 2015 03:46 IST2015-07-16T03:46:28+5:302015-07-16T03:46:28+5:30
आधुनिक भारतीय चित्रकार सय्यद हैदर रजा यांना ‘द लिजन आॅफ आॅनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रकलेतील अनोख्या

रजा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : आधुनिक भारतीय चित्रकार सय्यद हैदर रजा यांना ‘द लिजन आॅफ आॅनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रकलेतील अनोख्या उपलब्धींबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मंगळवारी रात्री उशिरा फ्रान्सच्या दिल्लीतील दूतावासात आयोजित कार्यक्रमात राजदूत फ्रेंकोई रिचियर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
मी याप्रसंगी फ्रान्सची कला आणि तेथील कलाप्रेमींना सलाम करतो. अतिशय आदराने हा पुरस्कार स्वीकारत आहे. मी मनापासून आभार व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
रजा यांचे भाषण त्यांचे मित्र प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी यांनी वाचून दाखविले. ९३ वर्षीय चित्रकाराला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणे हे त्यांचे सीमेपलीकडील योगदान तसेच फ्रान्स आणि भारतादरम्यानच्या स्थायी संबंधांची ओळख आहे. त्यांनी दोन देशांच्या कलेचा शोध, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञानाला जोडले आहे.
१८०२ मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती. कोणत्याही देशाचे नागरिकत्व असले तरी उत्कृष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. गडद रंगाचा सूट परिधान केलेले रजा व्हीलचेअरवरून आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जगाला सुंदर बनविण्यात योगदान
हा सन्मान फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून दिला जातो. ज्यांनी जगाला सुंदर बनविण्यात योगदान दिले अशा व्यक्तींना हा पुरस्कार बहाल केला जातो. रजा हे त्यापैकीच एक आहेत, असे राजदूत रिचियर म्हणाले. यावेळी रजा यांच्या जीवनावरील दोन भाषांमधील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यातील एक पुस्तक २००३ मध्ये मूळ फ्रेंच भाषेत लिहिले गेले असून त्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे.‘येट अगेन’ या अशोक वाजपेयी यांनी संपादित केलेल्या अन्य एका पुस्तकाचाही त्यात समावेश होता.