रेशनिंग दुकानदारांना उमेदवारांकडून अपेक्षा!
By Admin | Updated: September 22, 2014 04:44 IST2014-09-22T04:44:06+5:302014-09-22T04:44:06+5:30
आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणापत्रात जो राजकीय पक्ष रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या नमूद करेल, त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय

रेशनिंग दुकानदारांना उमेदवारांकडून अपेक्षा!
चेतन ननावरे■ मुंबई
आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणापत्रात जो राजकीय पक्ष रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या नमूद करेल, त्यालाच पाठिंबा देण्याचा निर्णय अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य, दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाने घेतला आहे. तरी सद्य:स्थितीत कमिशनवाढीची मुख्य मागणी प्रलंबित असल्याचे महासंघाचे प्रवक्ते नवीन मारू यांनी सांगितले.
मारू म्हणाले, की शिधावाटपामधील कमिशन वाढीसाठी संघटना गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहे, मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. दुकानातील इतर खर्चांच्या मानाने मिळणार्या अपुर्या कमिशनमुळे दुकानदारांना दर महिन्याला सुमारे २0 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनातर्फे दुकानदारांना गहू आणि तांदूळ विक्रीमागे प्रति किलो ५0 पैसे कमिशन दिले जाते. मात्र वाहतूक खर्चासाठी दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २0 पैसे खर्च करावे लागतात. मुळात वाहतूक खर्च हा शासनाची जबाबदारी असतानाही तो दुकानदारांच्या माथी मारला जात आहे. त्यामुळे दुकानदारांना प्रति किलो १ रुपये २0 पैशांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नुकसानीपासून वाचवण्यासाठी २ रुपये कमिशनवाढ देण्याची संघटनेची मागणी आहे.
महासंघाच्या मागण्यांचा घोषणापत्रात समावेश करणार्या पक्षाच्या पाठीशी महासंघ उभा राहील, असे मारू यांनी सांगितले.