रेल्वेच्या ‘कायाकल्पा’ची धुरा रतन टाटांच्या हाती!
By Admin | Updated: March 19, 2015 23:26 IST2015-03-19T23:26:54+5:302015-03-19T23:26:54+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.

रेल्वेच्या ‘कायाकल्पा’ची धुरा रतन टाटांच्या हाती!
नवी दिल्ली : येत्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा ‘कायाकल्प’ घडवून आणण्याचा रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेला संकल्प तडीस नेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.
रेल्वे यंत्रणा सुधारणे, ती कार्यक्षम करणे व तिच्या कारभात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणत्या नव्या कल्पना,योजना व पद्धती राबवाव्या लागतील हे सुचविण्याचे काम ही ‘कायाकल्प परिषद’ करेल. टाटा उद्योग समुहाचे मानसेवी अध्यक्ष रतन टाटा हे या परिषदेचे प्रमुख असतील. शिवाय आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन व नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमेन या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दोन सर्वात मोठ्या मान्यताप्राप्त संघटनांचे सरचिटणीस अनुक्रमे शिव गोपाल मिश्रा आणि एम. राघवय्या यांनाही या परिषदेवर सदस्य म्हणून नेमण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले. या दोघांच्या रूपाने रेल्वेचे सर्वच कर्मचारीही एक प्रकारे रेल्वेच्या कायाकल्पाचे शिवधनुष्य पेलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावतील. नव्या कल्पना समोर आल्याखेरीज कायाकल्प शक्य होणार नाही. परिषदेवर लवकरच आणखीही सदस्य नेमले जातील, असे रेल्वेमंत्री म्हणाले.
४असे म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळातील खासगी व संस्थानी रेल्वेंचे राष्ट्रीयीकरण केले गेले तेव्हा रेल्वे ताब्यात घेण्याची व ती कार्यक्षमतेने चालविण्याची तयारी टाटा उद्योग समूहाने दर्शविली होती. पण तसे घडले नाही आणि त्यानंतरच्या सुमारे सात दशकांत मरणासन्न अवस्थेप्रत आलेल्या रेल्वेत नवसंजीवनी कशी फुंकावी हे सुचविण्यासाठी सरकारला पुन्हा टाटांकडे वळावे लागले आहे.