पृथ्वी असेपर्यंत बलात्कार होतच राहणार - तृणमूल नेत्याची मुक्ताफळे
By Admin | Updated: August 28, 2014 18:41 IST2014-08-28T13:34:10+5:302014-08-28T18:41:52+5:30
'पृथ्वीवर जीवसृष्टी असेपर्यंत बलात्कार होतच राहणार' अशी मुक्ताफळे तृणमूल काँग्रेसचे आमदार दीपक हलदर यांनी उधळली आहेत.

पृथ्वी असेपर्यंत बलात्कार होतच राहणार - तृणमूल नेत्याची मुक्ताफळे
>कोलकाता, दि. २८- ‘जगात यापूर्वी बलात्कार होत होते, आजही होतात, जोपर्यंत पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, तोपर्यंत बलात्कार होतच राहणार’, अशी मुक्ताफळे तृणमूल काँग्रेसचे आमदार दीपक हलदर यांनी उधळली आहेत.
पश्चिम बंगालमधील आपल्या मतदारसंघातील भाषणादरम्यान हलदर यांनी बुधवारी हे बेताल वक्तव्य केले असून त्यांच्या या विधानावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. ‘मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये. मी बलात्काराचे सर्मथन करत नाही. बलात्कार ही एक सामाजिक विकृती आहे. तुम्ही किंवा मी एकटे ही समस्या सोडवू शकत नाही. सामूहिकरित्या त्या समस्येविरोधात लढणे गरजेचे आहे’, असेही हलदर पुढे म्हणाले.
दरम्यान हलदर यांच्या या विधानावरून वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
‘हलदर यांच्या वक्तव्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून बलात्काराबाबत करण्यात येणा-या बेजबाबादार विधानांमध्ये भर पडली आहे. या विधानांवरून त्यांची विचारसरणी दिसून येते,’ अशी प्रतिक्रिया सीपीएम नेत्या सुजन चक्रवर्ती यांनी दिली आहे. तर ‘तृणमूलच्या नेत्यांना कसे बोलावे, याचे भान नाही’ अशी टीका काँग्रेसच्या एका नेत्याने केली आहे.
‘ज्या पक्षाची प्रमुख एक स्त्री आहे, त्याच पक्षाचे नेते महिलांबद्दल असे वक्तव्य करतात ही लाजिरवाणी बाब आहे,’ अशी टीका भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केली.
याआधी तृणमूल काँग्रेसचे आणखी एक नेते तपस पॉल यांनीही असेच वादग्रस्त विधान केले होते. 'सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना हात जरी लावला तर तृणमूलच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करू' अशी धमकी पॉल यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला होता.