ननवरील बलात्कार; चर्चवर हल्ल्याचा राज्यसभेत निषेध
By Admin | Updated: March 16, 2015 23:42 IST2015-03-16T23:42:07+5:302015-03-16T23:42:07+5:30
पश्चिम बंगालमध्ये ७० वर्षांच्या ननवर झालेला बलात्कार आणि हरियाणातील चर्चवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा मुद्दा सोमवारी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला.

ननवरील बलात्कार; चर्चवर हल्ल्याचा राज्यसभेत निषेध
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ७० वर्षांच्या ननवर झालेला बलात्कार आणि हरियाणातील चर्चवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा मुद्दा सोमवारी राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. या दोन्ही घटनांचा सदस्यांनी निषेध केला आणि या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली.
हा मुद्दा उपस्थित करताना भाकपचे डी. राजा म्हणाले, या संदर्भात नियम २६७ अंतर्गत स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि यावर सभागृहात तात्काळ चर्चा व्हायला पाहिजे. ननवरील बलात्कार आणि चर्चवरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करताना अतिशय दु:ख होत आहे. एका भाजप नेत्याने गुवाहाटीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करून, या देशात हे काय चालले आहे, असा सवाल राजा यांनी यावेळी केला. त्यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, अशा घटनांबाबत राज्य सरकारांनी कठोर कारवाई करायला पाहिजे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. देशात सांप्रदायिक सौहार्द कायम राखायलाच पाहिजे, यात दुमत नाही. प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे.
गृह मंत्रालयाने मागविला अहवाल
हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात निर्माणाधीन चर्चवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने हरियाणा सरकारला अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
या हल्ल्याप्रकरणी केलेल्या कारवाईची माहितीही पाठविण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
हिस्सार जिल्ह्याच्या कैमरी गावात रविवारी काही लोकांनी निर्माणाधीन चर्चवर हल्ला करून तेथील कूलर व अन्य सामानाची तोडफोड केली आणि क्रूस हटवून त्याजागी हनुमानाची मूर्ती व रामाचे चित्र असलेला ध्वज लावला होता. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागे एखाद्या गटाचा हात आहे किंवा काय आणि कुणाला अटक केलेली आहे किंवा काय, याची माहिती देऊन विस्तृत अहवाल पाठवा, असे गृहमंत्रालयाने हरियाणा सरकारला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
अल्पसंख्यकांच्या धार्मिक संस्थांचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, हे सुनिश्चित करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे निर्देशही गृहमंत्रालयाने राज्य सरकारला दिले आहेत. चर्चवरील हल्ल्याच्या संदर्भात फादर सुभाष चांद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोरांनी फादर चांद यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. (वृत्तसंस्था)
दहा जण ताब्यात
४रानाघाट (प.बंगाल) : पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात एका कॉन्व्हेंटमध्ये ७१ वर्षांच्या ननवरील सामूहिक बलात्कार आणि दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण दहा जणांना ताब्यात घेतले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्नब घोष यांनी सोमवारी ही माहिती दिली.
४कॉन्व्हेंटच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे. त्यांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात युद्धस्तरावर शोधमोहीम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
कॉन्व्हेंटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कथितरीत्या चार आरोपींचे चेहरे दिसत आहेत. काल रविवारी पोलिसांनी त्यांची छायाचित्रे जारी केली होती. याप्रकरणी माहिती देणाऱ्यास पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
दरोडेखोरांची एक टोळी शनिवारी मध्यरात्री कॉन्व्हेंटमध्ये शिरली होती. सात जणांच्या या टोळीतील चार जणांनी कॉन्व्हेंटमधील ननवर सामूहिक बलात्कार केला आणि यानंतर कपाटातील १२ लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. (वृत्तसंस्थाा)
मागवला अहवाल
४ननवरील बलात्कार प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागितला आहे.
४कॉन्व्हेंटमध्ये पुरेसा सुरक्षा बंदोबस्त होता का आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केंद्राने केली आहे.