जेलबाहेर आणून बलात्काऱ्याची हत्या
By Admin | Updated: March 7, 2015 02:05 IST2015-03-07T02:05:04+5:302015-03-07T02:05:04+5:30
संतप्त जमावाने बलात्कार प्रकरणातील आरोपीची बदडून हत्या केली़ या वेळी जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये २५ वर्षांच्या एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे.

जेलबाहेर आणून बलात्काऱ्याची हत्या
नागालँडमध्ये जमावाचा हल्ला : पोलीस गोळीबारात १ ठार, २० जखमी
गुवाहाटी : नागालँडच्या दीमापूर येथील जिल्हा कारागृहाबाहेर गुरुवारी संतप्त जमावाने बलात्कार प्रकरणातील आरोपीची बदडून हत्या केली़ या वेळी जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये २५ वर्षांच्या एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शुक्रवारी दीमापूर येथे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. बुधवारपासूनच या बलात्काराच्या घटनेविरोधात निदर्शने सुरू आहेत, यामध्ये वाहनांच्या जाळपोळीसारख्या घटनाही घडल्या आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकरणात मध्यवर्ती कारागृहाच्या पोलिस अधिक्षकासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलबिंत केले आहे. सय्यद फरीद खान असे मृत आरोपीचे नाव आहे़ संशयित बांगलादेशी नागरिक असलेला सय्यद हा जुन्या कारचा डीलर होता़ २३ फेबु्रवारीला नागा मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता़ खानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत काल नागा स्टुडंट फेडरेशन आणि नागा महिला संघटनांनी ‘बंद’चे आवाहन केले होते़ दीमापूरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता़ याउपरही गुरुवारी शेकडो स्थानिकांनी बंगाली भाषिक मुस्लिमांचा व्यापार परवाना रद्द करण्याची मागणी करीत मोर्चा काढला़ यादरम्यान संतप्त निदर्शक बळजबरीने कारागृहात शिरले आणि त्यांनी आरोपी खानचा ताबा घेतला़ त्याला दुचाकीला बांधून फरफटत मुख्य चौकात नेले़ स्थिती नियंत्रणात येईपर्यंत आणि आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता़