अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालक फरार
By Admin | Updated: December 7, 2014 12:19 IST2014-12-07T12:16:13+5:302014-12-07T12:19:42+5:30
दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करणा-या २५ वर्षीय तरुणीवर टॅक्सीचालकाने (कॅब ड्रायव्हर) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालक फरार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि ७ - दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करणा-या २५ वर्षीय तरुणीवर टॅक्सीचालकाने (कॅब ड्रायव्हर) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी ज्या गाडीत ही घटना घडली ती गाडीदेखील जप्त केली असून टॅक्सी चालक फरार आहे.
उत्तर दिल्लीत राहणारी २५ वर्षीय तरुणी गुडगावमधील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये एक्झिकेटीव्ह पदावर कार्यरत आहे. पिडीत तरुणी तिच्या ऑफीसमधील सहका-यांसह गुडगावमधील एका पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. रात्री साडे नऊच्या सुमारास पिडीत तरुणी गुडगावमधून दिल्लीतील वसंत विहारपर्यंत मित्रासोबत आली. तिथून घरी जाण्यासाठी तिने 'उबर' या मोबाईल अॅपद्वारे टॅक्सी बुक केली. रात्री १०. २० च्या सुमारास कॅब चालक आल्यावर ती घराच्या दिशेने रवाना झाली. या प्रवासा दरम्यान पिडीत तरुणीचा डोळा लागला व ती झोपेतून उठली तेव्हा कॅबचालक तिच्याबाजूला बसला होता. कॅब चालक तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. याप्रकाराला तिने विरोधही दर्शवला मात्र कॅब चालकाने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला निर्जनस्थळी सोडून दिले. पळ काढताना ड्रायव्हरने तिचा मोबाईल नंबर घेतला व पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने पळ काढणा-या ड्रायव्हरच्या टॅक्सीचा फोटो काढला व मित्राला मेसेज करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटचा कॉल हा टॅक्सीचालकाला केल्याने हा मेसेज टॅक्सी चालकालाच गेला. अखेरीस तिने १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत मागितली.
दरम्यान, पोलिसांनी या टॅक्सीचालकाचा शोध घेतला असून त्याचे नाव शिवकुमार यादव असल्याचे उघड झाले आहे. तो मथुरातील निवासी असून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आहे. शिवकुमारला ताब्यात घेतल्याचे वृत्त असले तरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. उबर या अमेरिकेतील मोबाईल अॅप कंपनीने दिल्ली आणि परिसरात अॅपद्वारे टॅक्सी बुक करण्याची सेवा दिली असून पोलिस या कंपनीच्या संपर्कात आहे. मात्र उबरकडेही शिवकुमारची कोणतीही माहिती नसल्याचे समजते. त्यामुळे मोबाईल अॅपद्वारे टॅक्सी बुक करण्याच्या पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.