भोपाळः राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ती मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रामदास आठवले म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटात त्यांचं(प्रज्ञा सिंह) नाव होतं आणि तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे या प्रकरणात सबळ पुरावे होते. दहशतवाद्यांशी लढताना करकरे शहीद झाले. करकरे यांच्या संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी त्या विधानाचा निषेध करतो. आता न्यायालयाचं ठरवायचं आहे काय योग्य आणि काय अयोग्य आहे.प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या की, करकरे 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, कारण 2008मध्ये मालेगाव स्फोटाच्या चौकशीदरम्यान त्यांनी माझा छळ केला होता, तेव्हा मी त्यांना शाप दिला होता. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यावर आठवले म्हणाले, जर आमच्या पक्षाला निर्णय घ्यायचा असता तर आम्ही कधीच त्यांना उमेदवारी दिली नसती.
रामदास आठवलेंचा प्रज्ञा सिंहांच्या उमेदवारीला विरोध, मोदी सरकारला 'घरचा अहेर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:08 IST