कोलकात्यात सापडलं सहाव्या शतकात लिहिलेलं रामायण
By Admin | Updated: December 19, 2015 14:13 IST2015-12-19T14:13:57+5:302015-12-19T14:13:57+5:30
कोलकात्यातल्या एका संस्कृत वाचनालयामध्ये अभ्यासकांना सहाव्या शतकात लिहिलेल्या रामायणाची प्रत सापडली असून ही वाल्मिकी रामायणापाठोपाठची सगळ्यात जुनी प्रत असण्याची शक्यता आहे.

कोलकात्यात सापडलं सहाव्या शतकात लिहिलेलं रामायण
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - कोलकात्यातल्या एका संस्कृत वाचनालयामध्ये अभ्यासकांना सहाव्या शतकात लिहिलेल्या रामायणाची प्रत सापडली असून ही वाल्मिकी रामायणापाठोपाठची सगळ्यात जुनी प्रत असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या रामायणात रामाला देवत्वापेक्षा जास्त मानवी अंगाने रंगवण्यात आले आहे. राम, सीता व रावण यांच्याभोवती रामायण घडत असले तरी दु:ख, अपयश आदी भाव भावनांचा या रामायणात विस्ताराने समावेश करण्यात आला आहे. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातले वाल्मिकी रामायण व १२व्या शतकातले तमिळ कवी कंब यांचे रामायण समाजमान्य असून त्यामध्ये सात खंड आहेत. मात्र, कोलकात्यात आढळलेल्या रामायणात मात्र पाच खंड आहेत आणि रामाच्या बालपणीच्या कालखंडाचा याच समावेश नाहीये. या रामायणात काही बाबी बारकाईने दिल्या आहेत. विवाहाच्या वेळी राम व सीतेचे वय काय होते, रावणाने सीतेला पळवले तो दिवस कुठला आदी बाबींचा समावेश या रामायणात असल्याचे या विषयातील तज्ज्ञ मनबेंदू भट्टाचार्य यांनी सांगितले आहे.
रामायणाची ही आवृत्ती अपघातानेच हाती लागली आहे. काही अभ्यासक संस्कृत वाचनालयामध्ये सहाव्या शतकातल्या अग्निपुराणावर संशोधन करत असताना त्यांना हे रामायण सापडले.