Ram Mandir Security: अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. 2024 मध्ये राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्याची योजना सरकारची आहे. राम मंदिर जेवढे भव्य बनवले जात आहे, तेवढीच येथील सुरक्षेची काळजीही घेतली जाणार आहे. यासाठी फक्त पोलिसांवर अवलंबून न राहता, उत्तर प्रदेश पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा यंत्रणा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राम कुमार विश्वकर्मा यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, मंदिराच्या सुरक्षेसाठी आणल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर 77 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डीजीपी राम कुमार विश्वकर्मा 9 एप्रिल रोजी अयोध्येतील राखीव पोलिस लाइनमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डीजीपींनी राम मंदिराच्या सुरक्षेबाबत बरीच माहिती दिली. पुढील वर्षीपासून राम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अयोध्येत येण्यास सुरुवात होणार असल्याने सुरक्षेत कोणतीही चूक केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानबाबत बोलताना डीजीपी म्हणाले की, सुरक्षेसाठी अयोध्येत अनेक वॉच टॉवर बांधले जातील. पोलिस तैनातीशिवाय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षा अधिक मजबूत करता यावी, यासाठी एक्स-रे मशिन, टेहळणीसह हायटेक उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.