Ram chander jangra controversy: ऑपरेशन सिंदूरबद्दल भाजप नेत्याच्या विधानाने भडकलेला वाद सुप्रीम कोर्टात असतानाच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात विधवा झालेल्या महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा म्हणाले की, 'आपला पती गमावणाऱ्या महिलांमध्ये लढाऊ बाणा नव्हता. जोश नव्हता.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरयाणातील भिवानी येथे पंचायत भवनमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना जांगडा यांनी हे विधान केले.
पहलगाममध्ये विधवा झालेल्या महिलांबद्दल काय बोलले जांगडा?
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांमध्ये लढाऊ बाणा तयार करण्यासाठी एक मोठी योजना (अग्निवीर) आणली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला वाटतंय की, मोदी देशातील तरुणांना जे प्रशिक्षण देऊ इच्छित आहे, ते प्रशिक्षण जर पर्यटकांनी घेतलेले असते, तर तीन दहशतवादी २६ लोकांना मारून शकले नसते", असे जांगडा म्हणाले.
"...तर तिन्ही दहशतवादी मारले गेले असते"
"जर पर्यटकांच्या हातात काठ्या वा इतर काही असते आणि ते चौहीबाजूंनी दहशतवाद्यांच्या दिशेने गेले असते, तर मी दाव्याने सांगतो की, ५ किंवा ६ लोकांचा मृत्यू झाला असता. पण, तिन्ही दहशतवादी मारले गेले असते", अशा विधान जांगडा यांनी केले.
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा सामना महिलांनी करायला हवा होता. महिलांनी हात जोडण्याऐवजी सामना केला असता, तर कमी लोक मेले असते. कुंकू गमावलेल्या महिलांमध्ये लढाऊ बाणा नव्हता", असे वादग्रस्त विधान जांगडा यांनी केले.