हरीश गुप्ता, नवी दिल्लीसत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि काँग्रेसमध्ये विरोधी नेतेपदावरून वाद रंगला असताना आता त्यात राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या संसदीय कार्यालयांवरून भर पडण्याची चिन्हे आहेत़ संसदेतील कार्यालयांच्या वाटपात रालोआ आणि संपुआपासून दूर असलेल्या बिजू जनता दलाने (बीजद) बाजी मारली आहे़ संसदेत केवळ २७ सदस्य (लोकसभा २० आणि राज्यसभा ७) असलेल्या या पक्षाला लोकसभा सचिवालयाने तळमजल्यावरील कार्यालय क्रमांक ४५ दिले आहे़ विशेष म्हणजे जास्त खासदार असलेल्या अण्णाद्रमुक आणि तृणमूल काँग्रेसला डावलून बीजदला हे कार्यालय दिले गेले आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकचे संसदेत ४८ खासदार आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून लोकसभा सचिवालयाने अण्णाद्रमुकला संसद भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर धाडले आहे. ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील तृणमूल काँग्रेसकडे ४६ खासदार (३४ लोकसभेत अणि १२ राज्यसभेत) आहेत़ या पक्षालाही तिसऱ्या माळ्यावरील कार्यालय देण्यात आले आहे़ जनता दल(युनायटेड)कडे दीर्घ काळापासून तळमजल्यावरील कार्यालय होते़ मात्र यावेळी या पक्षालाही तिसऱ्या माळ्यावर हलविण्यात आले आहे़ तथापि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ खासदार असलेल्या या पक्षाने आपले कार्यालय रिकामे करण्यास नकार दिला आहे़ अर्थात एकही जदयू नेता याबाबत बोलायला तयार नाही़
रालोआची बीजदला पसंती
By admin | Updated: July 4, 2014 05:11 IST