मालवीयनगरच्या जागेसाठी रस्सीखेच !
By Admin | Updated: February 5, 2015 02:39 IST2015-02-05T02:39:39+5:302015-02-05T02:39:39+5:30
आपने मालवीयनगर येथून सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे़़ आपण जिंकू, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे़

मालवीयनगरच्या जागेसाठी रस्सीखेच !
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रतिष्ठित मालवीयनगर जागेवर भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) तिन्ही पक्ष विजयाचा दावा करीत असतानाच, खिरकी एक्स्टेंशनमध्ये अर्ध्या रात्री एका घरावर मारण्यात आलेला छापा या ठिकाणच्या मतदानात निर्णायक भूमिका साकारू शकतो़
गतवर्षी दिल्लीत आपचे सरकार असताना तत्कालीन कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी कथित देहविक्रय व्यवसायातील रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने खिरकी एक्स्टेंशन भागातील एका घरावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला होता़ पोलिसांना सोबत न घेता ही कारवाई केल्यामुळे सोमनाथ भारती टीकेचे धनी ठरले होते़
आपने मालवीयनगर येथून सोमनाथ भारती यांना मैदानात उतरविले आहे़़ आपण जिंकू, असा विश्वास भारती यांनी व्यक्त केला आहे़ मात्र काँग्रेस आणि भाजपा उमेदवारांच्या मते, गतवर्षीचा ‘ खिरकी छापा’ भारतींच्या विजयातील मोठा अडसर ठरू शकतो़ काँग्रेसने या जागेवर दोनदा आमदार राहिलेले योगानंद शास्त्री यांना मैदानात उतरविले आहे़ तर भाजपाने नंदिनी शर्मा या नव्या चेहऱ्याला तिकीट दिले आहे़ १९९८ आणि २००३ मध्ये मालवीयनगर येथून निवडणूक जिंकणारे योगानंद शास्त्री यांच्या मते, ‘खिरकी छाप्यामुळे’ या भागातील लोक प्रचंड नाराज आहेत़ भारती आपचे एक लोकप्रिय नेते होते़ मात्र या घटनेनंतर त्यांची लोकप्रियता घटली आहे़ काँग्रेसला याचा फायदा मिळू शकतो़ आपने मात्र या दाव्याचे खंडन केले आहे़ ‘खिरकी छाप्यामुळे’ आपला काही प्रमाणात तोटा सोसावा लागला़ मात्र त्याचवेळी या घटनेनंतर आमच्या पक्षाला युवकांचे समर्थन वाढल्याचा आपचा दावा आहे़
भारती हे आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांचाही त्यांना पाठिंबा आहे़ या भागातील बहुतांश जनता आमच्या पाठीशी आहे, असे आपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले़ खुद्द भारती यांनी मी पुन्हा जिंकले, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे़