राज्यसभा दिली म्हणजे उपकार केले नाहीत
By Admin | Updated: September 23, 2014 05:04 IST2014-09-23T05:02:25+5:302014-09-23T05:04:00+5:30
प्रकाश जावडेकर यांना डावलून आपल्याला राज्यसभा देऊन भाजपाने सन्मान केला आहे

राज्यसभा दिली म्हणजे उपकार केले नाहीत
मुंबई : प्रकाश जावडेकर यांना डावलून आपल्याला राज्यसभा देऊन भाजपाने सन्मान केला आहे. पण लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे ४२ लोक निवडून आले त्यामध्ये रिपब्लिकन मतांचा सहभाग आह की नाही? त्यामुळे राज्यसभा देऊ भाजपाने आमच्यावर उपकार केलेले नाहीत. पुन:पुन्हा राज्यसभा दिल्याचा उल्लेख व्हायला नको, अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी आपली नापसंती व्यक्त केली.
महायुतीच्या जागावाटपात भाजपाने आडमुठी भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केलेला १५१ व ११९ जागांचा फॉर्म्युला चुकीचा नाही. भाजपाने आता फार तणातणी करू नये. आता भाजपाने ऐकले पाहिजे अन्यथा एकदा कुणाची ताकद किती ते स्वबळावर लढवून पाहावे. शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढले तर रिपाइंने काय करावे या पर्यायाच्या शोधात आपण आहोत, असे ते म्हणाले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. भाजपाकरिता आता आपण जागा कमी करून देणार नाही. महादेव जानकर किंवा अन्य कुणाला आपल्या जागा द्यायच्या असतील तर द्याव्या, असे आठवले म्हणाले. रिपाइंला गुलामासारखे वागवू नका. शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इमानदारीत साताऱ्यात काम केले असते तर आमच्या उमेदवाराचे डिपॉझिट गेले नसते.