तिस-या दिवशीही राज्यसभा ठप्प
By Admin | Updated: December 18, 2014 05:04 IST2014-12-18T05:04:32+5:302014-12-18T05:04:32+5:30
बळजबरीने करण्यात आलेले धर्मांतर आणि सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर

तिस-या दिवशीही राज्यसभा ठप्प
नवी दिल्ली : बळजबरीने करण्यात आलेले धर्मांतर आणि सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, या मागणीवर समस्त विरोधी पक्ष ठाम राहिल्याने आणि सरकारने ही मागणी अमान्य केल्याने सलग तिसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले. या दरम्यान काँग्रेसचे सदस्य हनुमंता राव यांना नियम २५५ अन्वये संपूर्ण दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान गदारोळामुळे राज्यसभेत विमा विधेयक मांडण्यात सरकारला अपयश आले. आता हे विधेयक लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा सरकार विचार करीत असल्याचे समजते.
राज्यसभेत प्रचंड गदारोळातच विमान अपहरण निवारण दुरुस्ती विधेयक २०१४ ध्वनी मताने मंजूर करण्यात आले. तसेच दुसरे एक संबंधित विधेयक मागे घेण्यात आले.
पंतप्रधान उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यसभेत हजर राहणार आहेत, असे संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. परंतु ते धर्मांतर वा सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावर उत्तर देणार किंवा काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)