Rajnath Singh India Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारताकडूनपाकिस्तानला सातत्याने इशारे दिले जाताहेत. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने खूप प्रगती केली आहे. आपली संरक्षण रचना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. दहशतवादात सहभागी असलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागेल,' असे राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधताना पीओकेचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'पीओकेमधील लोक आपले आहेत, त्यांना फक्त दिशाभूल केले जात आहे. पीओके आपलाच एक भाग आहे आणि मला विश्वास आहे की, एक दिवस पीओके स्वतःच भारतात सामील होण्यास तयार होईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पीओकेची तुलना महाराणा प्रताप यांच्याशी
राजनाथ सिंह म्हणाले, 'पीओके हे महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंहसारखे आहे. महाराणा प्रताप शक्ती सिंह यांच्याबद्दल म्हणायचे, आता वेगळे झाले असले तरी ते आमचे भाऊ आहेत. ते कुठेही गेले तरी आमच्याकडे परत येतील. त्याचप्रमाणे, पीओके काही काळापासून आमच्यापासून वेगळा झाला आहे, परंतु तो आपल्या भावाकडे परत येईल. पीओकेमध्ये राहणाऱ्या आमच्या भावांची परिस्थिती शूर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखीच आहे.'
आता चर्चा फक्त दहशतवादावर राजनाथ सिंह पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेबाबत म्हणाले की, 'पाकिस्तानला हे समजले आहे की दहशतवादाला प्रोत्साहन देणे परवडणारे नाही. आता जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा ती पीओकेवर, दहशतवादावर असेल. आम्ही मोदीजींच्या एक भारत, महान भारताच्या संकल्पाशी वचनबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की, पीओकेतील लोक कधीतरी भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील.'