नितीन गडकरींकडून राजमुद्रा भेट, दिल्ली दरबारी उदयनराजेंची 'रोड पे चर्चा'

By महेश गलांडे | Published: February 11, 2021 05:14 PM2021-02-11T17:14:55+5:302021-02-11T17:15:49+5:30

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे ते सातारा या दरम्यानच्या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत भेट घेतली.

Rajmudra gift from Nitin Gadkari, Delhi Darbari Udayan Raje's 'road pay discussion' | नितीन गडकरींकडून राजमुद्रा भेट, दिल्ली दरबारी उदयनराजेंची 'रोड पे चर्चा'

नितीन गडकरींकडून राजमुद्रा भेट, दिल्ली दरबारी उदयनराजेंची 'रोड पे चर्चा'

googlenewsNext
ठळक मुद्दे कराड शहराच्या पूर्व भागाला जोडणार हा रिंगरोड असेल. तर साकुर्डी-येणके-येरावळे-विंग-धोडेवाडी फाटा ते पाचवड हा पश्चिम भागाला जोडणारा रिंग रोड असेल.

नवी दिल्ली - राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावेळी, अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण रस्त्यासंदर्भात चर्चा केली. या कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. तसेच, राज्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले. त्यानंतर गडकरी यांनी शेंद्रे-कागल महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यानां तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही गडकरींनी दिल्याचे खासदार उदयनराजे यांनी आपल्या फेसबुकवरुन सांगितले. 

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे ते सातारा या दरम्यानच्या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत भेट घेतली. या भेटीत सातारा जिल्ह्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा असलेल्या रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम कसे होईल. तसेच जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गाला जोडणारे जिल्ह्यांतर्गत रस्ते मजबूत करून पायाभूत सुविधा वाढवण्यावर आपला भर आहे. त्यासाठी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक तो निधी मिळवण्याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा झाली. शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड शहरातील वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्‍यावर उड्डाण पूल उभारण्याची मागणी यावेळी केली. या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. पुणे ते शेंद्रे राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच खंडाळा बोगद्याच्या कामाबाबत चर्चा केल्याचे उदयनराजे म्हणाले. 

याशिवाय कराड ग्रामीण भागातून शहराच्या दिशेने येणारे रस्ते कराड शहराभोवती रिंग रोडच्या माध्यमांतून जोडण्याचा प्रस्ताव असून हारस्ता तासवडे-शहापूर-अंतवडी-कार्वे-वडगाव- हवेली-कोडोली-पाचवड फाटा असा आहे. त्यामुळे कराड शहराच्या पूर्व भागाला जोडणार हा रिंगरोड असेल. तर साकुर्डी-येणके-येरावळे-विंग-धोडेवाडी फाटा ते पाचवड हा पश्चिम भागाला जोडणारा रिंग रोड असेल. तर पाटण तालुक्यांतील डिचोली कोयनानगर-हेळवाक-मोरगिरी-म्हारूल हवेली-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन या राज्य महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव असून त्याबाबतही चर्चा झाल्याचं उदयनराजे यांनी माहिती देताना म्हटलं आहे. 

दरम्यान, या भेटीत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी उदयनराजेंना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. त्यामुळे, दिल्लीतही त्यांना मान-सन्मान केला जातो. 
 

Web Title: Rajmudra gift from Nitin Gadkari, Delhi Darbari Udayan Raje's 'road pay discussion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.