राजन, सुब्रमणियन अमेरिकेने लादले
By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T04:14:07+5:302016-08-26T06:54:38+5:30
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले.

राजन, सुब्रमणियन अमेरिकेने लादले
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांना भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. राजन व अरविंद सुब्रमणियन हे फक्त व्यवस्थापनातील पदवीधर आहेत. त्यांना अमेरिकेने भारतावर लादले आहे. ते संकुचित विचाराचे आहेत, अशी टीका स्वामी यांनी केली आहे.
स्वामी हे राजन यांच्यावर नेहमीच टीका करतात. त्यामागे असे कारण सांगितले जाते की, राजन यांनी व्याजदरात कपात केली नाही. स्वामी यांना असे वाटते की, व्याजदरात कपात केल्याने देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, तर बौद्धिक संपदा अधिकार प्रकरणी अरविंद सुब्रमणियन यांनी २०१३ मध्ये अमेरिकेला दिलेल्या सल्ल्यामुळे स्वामी यांनी त्यांना वारंवार लक्ष्य केले आहे. स्वामी यांचा असा दावा आहे की, अरविंद सुब्रमणियन यांनी अमेरिकेला असा सल्ला दिला होता की, या मुद्यावर त्यांनी भारताला डब्ल्यूटीओमध्ये खेचावे.
स्वामी यांनी गुरुवारी एक टिष्ट्वट केले, ‘अमेरिकेने आर ३ व एएस यांच्यासारख्या संकुचित विचारांच्या पदवीधरांना आमच्यावर लादले आहे.’ असे या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. स्वामी हे आर-३ या शब्दाचा वापर राजन यांच्यासाठी करतात, तर एएसचा अर्थ अरविंद सुब्रमणियन असा होतो. स्वामी व अन्य काही जणांकडून होत असलेल्या टीकेमुळेच राजन यांनी जूनमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.