सिमला/मंडी : हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे पडत असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषत: मंडी जिल्ह्यात ढगफुटीने हाहाकार माजवला असून, हवामानशास्त्र विभागाने मंडी, कांगडा आणि सिरमोरमध्ये नव्याने रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात आतापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांसाठी देशभरातील १५ राज्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मंडी जिल्ह्यातील तलवारा गावात झालेल्या ढगफुटीत संपूर्ण कुटुंब बेपत्ता असताना अवघ्या १० महिन्यांची नीतिका आश्चर्यकारकरीत्या बचावली आहे.
उत्तरेत पाऊस सुरूच
उत्तर भारतात अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू असून, राजस्थानात २४ तासांत एकट्या माधोपूर जिल्ह्यात तब्बल २१४ मिमी पाऊस पडला आहे. राज्यात इतरत्रही मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
देशभरातील स्थिती अशी : देशभरातील १५ राज्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दिल्लीतही ढग दाटून आले आहेत. उत्तर प्रदेशात ३० जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकट्या हिमाचलमध्ये आतापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला असून, उत्तराखंड व इतर राज्यांतही जीवित हानी झाली आहे. ३००हून अधिक लोक जखमी असून, ३० जण बेपत्ता आहेत.
ग्लोबल वॉर्मिंग...
हिमाचल प्रदेशासह देशाच्या अन्य भागांत अचानक पडत असलेला मुसळधार पाऊस व सततची ढगफुटी हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचे पर्यावरण व हवामान बदलाविषयीचे अभ्यासक तसेच राज्याचे अधिकारी सुरेश अत्री यांनी म्हटले आहे.
जनजीवन झाले विस्कळीत
बिहार व उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रोजगारावर याचा परिणाम झाला आहे.