नवी दिल्ली - भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही व असा विचार भविष्यातही कदापि असणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली.आधुनिकीकरण व नवे तंत्रज्ञान यासाठी रेल्वे खासगी व विदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या खासगीकरणाची भीती रेल्वे कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या खात्याच्या चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरीलप्रमाणे ग्वाही देऊन या शंकांना पूर्णविराम दिला.मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादनात येणाऱ्या अडचणी चर्चेतून लवकरच दूर होतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ‘राजधानी’ गाडी सुरू केली तेव्हाही असाच विरोध झाला होता, याचे स्मरण देऊन काही मंडळींना रेल्वेची तांत्रिक प्रगती नकोशी व्हावी हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही - पीयूष गोयल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:09 IST