दिवाळीत बदलणार रेल्वेचे रुपडे
By Admin | Updated: October 9, 2015 00:55 IST2015-10-09T00:55:14+5:302015-10-09T00:55:14+5:30
येत्या दिवाळीत रेल्वेच्या डब्यांचे पालटलेले रूप बघायला मिळेल. दशकानुदशकांपासून तेच जुने घासलेले, फाटलेले डबे बघत आलेल्या प्रवाशांना डब्यांचे नवे डिझाईन आकर्षित करणारे ठरेल
दिवाळीत बदलणार रेल्वेचे रुपडे
नवी दिल्ली : येत्या दिवाळीत रेल्वेच्या डब्यांचे पालटलेले रूप बघायला मिळेल. दशकानुदशकांपासून तेच जुने घासलेले, फाटलेले डबे बघत आलेल्या प्रवाशांना डब्यांचे नवे डिझाईन आकर्षित करणारे ठरेल. लांब पल्ल्याच्याच नव्हे तर पॅसेंजर गाड्यांनाही नवे डबे जोडलेले दिसतील. भोपाळच्या कार्यशाळेत तयार झालेले नवे डबे प्रवासाला निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनने डब्यांची नवी रचना तयार केली आहे. सध्याच्या डब्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला असून सर्वसाधारण, शयनयान ते वातानुकूलित वन, टू, थ्री टायरपर्यंत चकचकीत डब्यांनी रेल्वेला नवी झळाळी लाभणार आहे.
बर्थचे डिझाईन असो की शौचालयातील रचना असो कमी जागेच्या वापराचे सूत्र ठेवत हा बदल केला गेला आहे. प्रवाशांना सुलभ प्रवेश, स्वच्छता राखण्यात अधिक श्रम लागू नये अशी ही रचना आहे. वरच्या बर्थसाठी शिड्याही आकर्षक आहेत. जेवणासाठी असलेल्या ट्रेची रचनाही बदलण्यात आली आहे. शौचालये सोप्या पद्धतीने स्वच्छ ठेवता येतील आणि कोरडी राहतील अशा पद्धतीची असतील.
डब्यातील जुन्या बल्बची जागा नव्या एलईडींनी घेतली आहे. एकच रंग न ठेवता विविध रंगांचा वापरही मुक्तपणे करण्यात आला आहे. ‘एक भारत एक रेल्वे’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविलेली कल्पना प्रत्यक्षात आणताना रंगसंगती साधण्यात आली आहे.