दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही अर्थात काँग्रेसचा स्कोर 'शून्य' राहिला. यावरूनच आता भारतीय जनात पक्षाने काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या या कामगिरीवर संसदेत व्यंग्यात्मक निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीतील उच्च आय कर दरावर टीका केली आणि नवीन कर प्रणालीची तुलना करून ती सामान्य जनतेसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले.
संसदेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी एक छोटे पोस्टर दाखवले. त्यावर, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर '०' कर, असे लिहिलेले होते. ते म्हणाले की काँग्रेसला कदाचित हे 'शून्य' आवडणार नसेल. पण यामुळे कोट्यवधी सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या एका मीमचा उल्लेख करत ठाकूर म्हणाले, राहुलजी, जरा हे शून्य चेक करा. त्या मीममध्ये राहुल गांधींना फ्यूअल स्टेशन अटेंडन्ट म्हणून दाखवण्यात आले आहे. ते ड्रायव्हरला मीटरमध्ये 'शून्य' बघायला सांगत आहेत?
काँग्रेसच्या निवडणुकांतील कामगिरीवर प्रश्न - यावेळी अनुराग ठाकूर यांनी, काँग्रेसच्या गेल्या काही निवडणुकांतील खराब कामगिरीचाही उल्लेख केला. गेल्या काही निवडणुकांचा उल्लेख करत, त्या निवडणुकीत काँग्रेसने किती जागा जिंकल्या? असा प्रश्न अनुराग ठाकूर विचारत होते आणि प्रत्येक वेळी भाजपचे इतर खासदार "शून्य" म्हणत होते. ठाकूर पुढे म्हणाले, जर कोणी 'शून्या'च्या विक्रमाची यादी बनवली असेल तर ती काँग्रेस पक्षानेच बनवली आहे आणि हे राहुल गांधींच्या नेतृत्वात घडले आहे.
दिल्लीत काँग्रेसचा पराभव सुरूच -दिल्लीत १९९८ पासून सलग १५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते. मात्र, २०१४ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. याचा पाढाच ठाकुर यांनी संसदेत वाचला ते म्हणाले... २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या.
दिल्लीत भाजपचा ऐतिहासिक विजय -या निवडणुकीत भाजपने जवळजवळ तीन दशकांनंतर दिल्लीत शानदार पुनरागमन केले. दिल्लीतील ७० विधानसभा जागांपैकी भाजपला ४८ जागा, आपला २२ जागा, तर काँग्रेसला ० जागा मिळाल्या आहेत.