राहुल-सोनियांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
By Admin | Updated: May 16, 2014 16:40 IST2014-05-16T16:33:52+5:302014-05-16T16:40:59+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबादारी स्वीकारली.

राहुल-सोनियांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १६ - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी देशाला कसे सामोरे जाणार याची अटकळ बांधली जात असतानाच या दोघांनीही राजधानीत पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य दाखवत पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
केवळ एक ते दोन मिनिटांत त्यांनी आपले बोलणे आटोपते घेतले. तेवढ्या वेळात प्रथम बोलत राहुल यांनी देशात येऊ घातलेल्या नव्या सरकारचे अभिनंदन केले आणि पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले.
सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या नीती आणि सिद्धांतांच्या आधारावर आम्ही जनतेचा सामना केला. पण आम्हाला जनतेचे समर्थन मिळाले नाही. मतदारांच्या या निर्णयाचे आम्ही विनम्रतेने स्वागत करतो. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यासह त्यांनी अशी अपेक्षाही व्यक्त केली की केंद्रात येणारे नवे सरकार देशाच्या हित आणि अखंडत्वाशी तडजोड करणार नाही.