संघविरोधी विधान भोवणार, राहुल गांधींची याचिका फेटाळली
By Admin | Updated: March 10, 2015 14:46 IST2015-03-10T14:45:51+5:302015-03-10T14:46:12+5:30
महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली होते असे वक्तव्य करणे राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत.
संघविरोधी विधान भोवणार, राहुल गांधींची याचिका फेटाळली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली होते असे वक्तव्य करणे राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी दाखल झालेला झालेला मानहानीचा खटला मागे घेण्यासंदर्भात राहुल गांधींनी केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील सभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधीजींची हत्या केली होती असे वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी संघाचे भिवंडीतील सचिव राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी संघाची प्रतिमा मलिन केली असे कुंटे यांचे म्हणणे होते. ही तक्रार हेतूपूरस्सर करण्यात आली असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी राहुल गांधी यांच्यावतीने हायकोर्टात करण्यात आली होती. राहुल गांधींच्या याचिकेवर हायकोर्टाने मंगळवारी निर्णय देत ही याचिकाच फेटाळून लावली. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावल्याने राहुल गांधींविरोधात आता भिवंडीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला सुरुच राहणार हे स्पष्ट झाले.