काँग्रेसचे भवितव्य राहुल गांधींच्या हाती
By Admin | Updated: October 22, 2014 05:42 IST2014-10-22T05:42:51+5:302014-10-22T05:42:51+5:30
महाराष्ट्र आणि हरियाणातील पराभवाबद्दल राहुल गांधी यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशाआकांक्षा गांधी कुटुंबावरच टिकून आहेत

काँग्रेसचे भवितव्य राहुल गांधींच्या हाती
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील पराभवाबद्दल राहुल गांधी यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशाआकांक्षा गांधी कुटुंबावरच टिकून आहेत. कोट्यवधी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सामूहिक विश्वास दाखविला आहे, असे पक्षप्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.
काहींनी वैयक्तिकरीत्या शंका व्यक्त केली असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या क्षमतेविषयी नि:संशय विश्वास आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच काँग्रेसला भवितव्य असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते. आपण कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली. दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवासारख्या घडामोडी लोकशाही प्रक्रियेचा भाग आहेत. विजय आणि पराभव हा लोकशाहीचा भाग आहे. विजयाचा उन्माद नको पराभवाने खचून जाऊ नये, हेच पक्षाचे धोरण राहिले असे सांगत त्यांनी महाराष्ट्र, हरियाणाच्या पराभवाच्या कारणांना महत्त्व देण्याचे टाळले. काँग्रेसने हरियाणात चांगली लढत दिली आहे. या राज्यात कोणत्याही पक्षाला दोन पेक्षा जास्त टर्म सत्ता मिळालेली नाही. आम्ही सातत्याने दोनदा जनादेश मिळविले आहे. निवडणूक निकालाबाबत आत्मपरीक्षण करीत आवश्यकता भासणाऱ्या नव्या घटकांपर्यंत पोहोचण्याबाबत विचार केला जाईल,असे त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)