नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 'चौकीदार की दाढी मे तिनका' असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणावरुन वारंवार केंद्र सरकारला धारेवर धरणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना, तेथील एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर फिल्मी स्टाईलमध्ये आरोप केले आहेत. राहुल गांधींना असा दावा केला आहे की, ''इंफ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनेंशियल सर्व्हिसेज (IL&FS) कंपनीला 2007मध्ये नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा गिफ्ट सिटी नावाचा प्रकल्प दिला. मात्र या प्रकल्पांतर्गत कोणतेही काम झाले नाही, उलट याद्वारे फसवणूकच झाली''.
आयएलअँडएफएसमध्ये 40 टक्के हिस्सा एलआयसी, एसबीआय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी संस्थांचा आहे. यावरुन काँग्रेसनं काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्या कंपनीमध्ये 40 टक्के सरकारी कंपन्यांचा हिस्सा आहे, त्यावर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज कसे वाढले?, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
(Rafale deal : 'चौकीदारानेच चोरी केली; अंबानींना 30 हजार कोटींचे गिफ्ट दिले')
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चहुबाजूंनी टीकास्त्र सोडत आहेत. यापूर्वीही राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवताना, देशाचे चौकीदारच भ्रष्टाचारी आणि चोर निघाले, असा सनसनाटी आरोप केला. मोदी यांनी देशातील जनता व सैनिकांचा विश्वासघात केला असून, सैनिकांच्या खिशातून पैसा काढून अनिल अंबानी यांचा खिसा भरला, अशी टीकाही त्यांनी केली.