नवी दिल्ली - लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदार यादीतील गडबडीबाबत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मतचोरीच्या आरोपावरून काँग्रेसकडून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढली जात आहे. विरोधकांनी लावलेल्या आरोपावरून अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही पत्रकार परिषद घेतली होती. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींच्या आरोपावरून खुलासा केला होता. या पत्रकार परिषदेनंतर व्होट वाइबकडून एक सर्वे करण्यात आला.
या सर्व्हेत विरोधकांनी निवडणूक आयोगावर लावलेल्या आरोपावर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात ३४ टक्के लोकांनी विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत तर २८ टक्के लोकांनी निवडणूक आयोग या आरोपांवर योग्य उत्तर देण्यास अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे.
व्होट वाइब सर्व्हेतून समोर काय आले?
सर्व्हेनुसार, १८ टक्के लोकांनी निवडणूक आयोगाने काही उत्तरे दिली त्यावर समाधान व्यक्त केले तर काहींनी अजूनही उत्तरे मिळाली नाहीत असं सांगितले. दुसरीकडे २० टक्के लोकांनी यावर मत व्यक्त करण्यास नकार दिला. मात्र या सर्व्हेत ३४ टक्के लोक निवडणूक आयोगाच्या बाजूने राहिल्याचे दिसून आले. तर ४६ टक्के लोक निवडणूक आयोगाशी पूर्णपणे सहमत नाहीत अथवा यावर कुणाचीही बाजू घेण्यास तयार नाहीत.
सी वोटरच्या सर्व्हेत धक्कादायक आकडे
याच मुद्द्यावर मागील काही दिवसांपूर्वी सी वोटरनेही सर्व्हे केला होता. त्यात ५९ टक्के लोक निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केलेल्या आरोपाशी सहमत दिसले तर ३४ टक्के लोक निवडणूक आयोगाच्या बाजूने दिसले. तर ६७ टक्के लोकांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे या बाजूने होते. १३ टक्के लोक यावर सहमत नाहीत हे समोर आले.