नवी दिल्ली: गुजरातमध्ये बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिकांनी उत्तर भारतायींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे असणारे शेकडो लोक गुजरातमधून पलायन करत आहेत. उत्तर भारतीयांवर गुजरातमध्ये हल्ले सुरू आहेत. यावरुन राजकारणदेखील पेटलं आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेवरुन सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस आल्याचं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून होणाऱ्या पलायनावरुन काँग्रेसमधील कोणत्याही मोठ्या नेत्यानं अद्याप प्रतिक्रिया दिलेली नव्हती. या प्रकरणावर आता राहुल गांधींनी भाष्य केलं आहे. 'गरिबी हीच सर्वात मोठी दहशत आहे. बंद पडलेले कारखाने आणि त्यामुळे गेलेला रोजगार हेच गुजरातमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचं मूळ आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्हींची स्थिती गंभीर आहे. कष्टकऱ्यांना लक्ष्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी याच्या विरोधात आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुजरातमधून उत्तर भारतात परतण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या लोकांचा फोटोदेखील राहुल यांनी ट्विट केला आहे.
व्यवस्था, अर्थव्यवस्था दोन्ही मोडकळीस; गुजरातमधील पलायनावरुन राहुल गांधीचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:06 IST