नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने काही हजार कोटी रुपये खर्च केले, असा आरोपही त्यांनी केला.ते म्हणाले की, पंतप्रधान कोण होणार या मुद्द्यावर आगामी लोकसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षांना निर्णय घेता येईल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबद्दल शंका उपस्थित होण्याचे कारणच नाही. त्यांच्या विरोधात इतका नकारात्मक प्रचार सुरू असतानाही त्यांनी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी आपल्या स्वभावामुळे लोकांची मने जिंकली. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला.राहुल १५ वर्षे राजकारणात असून लोकसभेचे सदस्यही आहेत. काँग्रेसचे पाच राज्यांत मुख्यमंत्री असून त्यांचेही ते नेतृत्व करतात, असे सांगून ते म्हणाले की, राहुल गांधी यांचे नेतृत्व व गुणांबद्दल शंका घ्यायला वावच नाही. राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत असे द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले होते. आता तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार -तेजस्वी यादव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:41 IST