रायपूर: सध्या देशाच्या राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे केवळ पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच घडू शकते, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. ते गुरुवारी छत्तीसगढमधील जाहीर सभेत बोलत होते. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी कर्नाटकमधील आमदारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर टीका केली. कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार आणि दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपामध्ये येण्यासाठी जनता दलाच्या (सेक्युलर) प्रत्येक आमदारासमोर 100 कोटी रूपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे यावेळी राहुल यांनी सांगितले. तत्पूर्वी राहुल यांनी ट्विटरवरूनही कर्नाटकमधील राजकीय नाट्यावर भाष्य केले होते. भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. या संपूर्ण प्रकरणावर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाकडून पोकळ विजयाचा आनंद साजरा केला जातो आहे. मात्र, लोकशाहीचा पराभव झाल्यानं देशभरात दु:ख व्यक्त होतं आहे, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
RSS जे करतंय तसं पाकिस्तान किंवा हुकूमशाहीतच होऊ शकतं- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:34 IST