Rahul Gandhi in Bihar : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी पाटण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी बिहार सरकारने केलेली जात जनगणना खोटी असल्याची टीका केली. आपल्या बिहार दौऱ्यात राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?खासदार राहुल गांधींनी शनिवारी बिहारची राजधानी पाटणा येथे संविधानाचे संरक्षण, या विषयावर आयोजित परिषदेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संविधान सुरक्षा परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणतात, बिहारमध्ये खोटी जात जनगणना करण्यात आली. देशात जात जनगणना योग्य पद्धतीने करावी लागेल. जात जनगणनेशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही.
देशातील जातींची खरी परिस्थिती शोधणे आवश्यक आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही तुमच्यासमोर जात जनगणना लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेऊ. जात जनगणना ही देशासाठी एक्सरे आणि एमआरआयसारखी आहे. कोणत्या वर्गात किती लोक आहेत, यातून कळेल, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
बिहारमधील काँग्रेस नेत्यांच्या भेटीआपल्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी सदकत आश्रमालाही भेट देतील. हे बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे (BPCC) मुख्यालय आहे. येथे ते नवीन कर्मचारी निवासस्थानाचे आणि नुकत्याच बांधलेल्या नवीन सभागृहाचे उद्घाटन करतील. या सभागृहाला त्यांच्या आजी आणि वडिलांचे नाव देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा त्यांचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा खास आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बिहारमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीची रणनीती बनवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.