गेल्या एक दोन वर्षांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेण्यात यशस्वी ठरले आहेत. त्याचा फायदा गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला होता. आताही पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सरकारला जेरीस आणले आहे. आता राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या माध्यम तज्ज्ञांना खास कानमंत्र दिला आहे. राहुल गांधी यांनी या नेत्यांना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि भाजपाला त्यांच्याच आखाड्यात चितपट करण्यासाठी भाजपाविरोधात आक्रमक रणनीती अवलंबण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिलेल्या या सल्ल्यामुळे भाजपासमोरील आव्हान वाढणार आहे. तसेच काँग्रेसच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याचं आव्हान भाजपासमोर असेल.
देशभरातून आलेले काँग्रेसचे प्रवक्ते आणि मीडिया पॅनलिस्ट यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, आपण भाजपाच्या जाळ्यात अडकता कामा नये. आपल्याला त्यांच्याच मैदानात जाऊन बॅटिंग करायची आहे. काँग्रेसला आपल्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपाच्याच आखाड्यात उतरून त्यांना पराभूत करावं लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक पद्धतीने आपली बाजू मांडावी, असे या माध्यमातून राहुल गांधी यांनी सूचवले.
यावेळी टीव्हीवर होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आक्रमक आणि मुद्देसूद विचार मांडावेत असे सुचवले. त्यांनी सांगितले की आपली लढाई ही पातळी सोडलेल्या लोकांसोबत आहे. मात्र आपण आपली पातळी सोडता कामा नये. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी निडरपणे मुद्देसूद आणि तार्किक आधारावर आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. जर चर्चेमध्ये संधी मिळाली नाही. तर आपली बाजू स्पष्टपणे मांडून चर्चा तिथेच सोडून द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
टीव्हीवरील चर्चांमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांना एकट्याने विरोधी पक्षांचे नेते आणि सूत्रसंचालकांचा सामना करावा लागतो, याची कबुली राहुल गांधी यांनी दिली. अशा परिस्थितीत प्रवक्त्यांनी हिंमत आणि आत्मविश्वासाने आपली बाजू मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला. या माध्यमातून राहुल गांधी यांनी भाजपाच्या आक्रमक भूमिकेला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राहुल गांधी यांच्या या रणनीतीमुळे भाजपासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.