राष्ट्रपती कोविंद यांच्या पहिल्याच भाषणावर काँग्रेसचा जोरदार आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 21:51 IST2017-07-26T21:46:58+5:302017-07-26T21:51:14+5:30
संसदेच्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ ग्रहणानंतर केलेले पहिलेच भाषण वादग्रस्त ठरले

राष्ट्रपती कोविंद यांच्या पहिल्याच भाषणावर काँग्रेसचा जोरदार आक्षेप
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 26 - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ ग्रहणानंतर केलेले पहिलेच भाषण वादग्रस्त ठरले आहे. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी महात्मा गांधींबरोबर दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख करून दोघांच्या कार्याची तुलना केली. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचा नामोल्लेख करणे कटाक्षाने टाळले. राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी त्यावर अत्यंत त्वेषाने गंभीर आक्षेप नोंदवला. सभागृहाचे नेते अर्थमंत्री जेटली आनंद शर्मांच्या आक्षेपावर प्रचंड भडकले आणि म्हणाले, सभागृहात राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा कशी होऊ शकते, त्यावर आक्षेप नोंदवण्याचे औचित्य काय ? जेटलींच्या विधानावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली.
शपथ ग्रहण सोहळ्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना रामनाथ कोविंद म्हणाले, ‘हमें तेजीसे विकसित होनेवाली एक मजबूत अर्थव्यवस्था, एक शिक्षित, नैतिक और साझा समुदाय, समान मूल्योंवाले और समान अवसर देनेवाले समाज का निर्माण करना होगा... एक ऐसा समाज, जिसकी कल्पना महात्मा गांधी और दीनदयाल उपाध्यायजी ने की थी... ये हमारे मानवीय मूल्योंके लिए भी महत्वपूर्ण है... ये हमारे सपनों का भारत होगा... इक्किसवी सदी में ऐसाही भारत हम सब चाहते है, जो सभी को समान अवसर सुनिश्चित करेगा’।
निवडक उल्लेखांचे राष्ट्रपतींचे हे भाषण म्हणजे महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचा सरळ सरळ अपमान आहे, असा आरोप करीत आनंद शर्मा म्हणाले, महात्मा गांधींबरोबर दीनदयाल उपाध्याय यांचे नाव जोडून दोघांची तुलना घडवणे, सर्वथा आक्षेपार्ह आहे. भाषणाच्या सुरुवातीला कोविंद यांनी केवळ सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख केला. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचे नामोल्लेख कटाक्षाने टाळला त्याबद्दलही आनंद शर्मांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.